इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण करून करिअर घडवण्यासाठी विठ्ठल ज्ञानेश्वर सानप (वय २४, रा.
वृंदावननगर, कामठवाडे, अंबड) याने दोन वर्षांपूर्वीच नोकरीला सुरुवात केली होती. मेहनतीच्या जोरावर आयुष्यात मोठे यश मिळवायचे आणि कुटुंबाची स्वप्ने पूर्ण करायची, अशी त्याची धडपड सुरू होती. मात्र, अंबड एमआयडीसी परिसरात अज्ञात ट्रकच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला. या घटनेने सानप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.शनिवारी (दि. ३१) मध्यरात्री एकच्या सुमारास विठ्ठल दुचाकीने अंबड एमआयडीसी परिसरातून घरी जात होता. अंबड येथील पॉवर हाउसजवळ एक्स्लो पॉइंटकडून गरवारेच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर अज्ञात ट्रकने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात विठ्ठलच्या डोक्याला आणि दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विठ्ठल अंबड येथील तुषार इंजिनीअरिंग कंपनीत व्हीएनसी प्रोग्रामर म्हणून काम करत होता. नोकरीच्या माध्यमातून अनुभव मिळवत भविष्य घडवण्याची त्याची तयारी होती. आई आणि लहान भाऊ नाशिकमध्ये नोकरी करतात, तर वडील बुलढाणा येथील मूळ गावी शेती करतात. कुटुंबाच्या भविष्यासाठी विठ्ठलकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, नियतीच्या एका घावाने कुटुंबाच्या आशा हिरावून घेतल्या. मोठी स्वप्ने उराशी बाळगून भविष्य घडवण्यासाठी धडपडणाऱ्या विठ्ठलचा प्रवास अवघ्या २४ व्या वर्षी संपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृताचा भाऊ उमेश सानप यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड करीत आहेत.