सराईत गुन्हेगारांवर दीपोत्सवात नजर

Contributed by: नाशिक,म. टा. प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
police monitoring habitual criminals during diwali enhanced security measures
दिवाळीच्या सुट्टीनिमित्त नागरिक गावी गेल्यावर त्यांची बंद घरे फोडून होणाऱ्या चोऱ्या आणि प्रवाशांसहित शहरातील नागरिकांच्या गळ्यातील ओरबडल्या जाणाऱ्या सोनसाखळ्यांसाठी पोलिसांनी नियोजन केले आहे. या संशयितांचा ‘बंदोबस्त’ करण्यासाठी शहरात नाकाबंदी सुरू होत आहे. यासह वारंवार या प्रकारचे गुन्हे करणाऱ्या सराइतांचीही चौकशी सुरू असून, पोलिस ठाण्यांसहित गुन्हे पथकांवर विशेष गस्त घालण्याची जबाबदारी असणार आहे. त्यासंदर्भातल्या सूचना आयुक्तालय व गुन्हे शाखेने सर्वांना दिल्या आहेत.

गत दोन वर्षांत दिवाळीदरम्यान घरफोडी काही प्रमाणात आटोक्यात आली असली, तरी नाशिककरांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी अंमलबजावणी पोलिसांनी सुरू केली आहे. बाजारपेठेत सुवर्ण खरेदीसह मोठ्या आर्थिक उलाढालींना सुरुवात झाल्याने बाजारात साध्या वेशातील पोलिसांची गस्त सुरू आहे. तसेच लवकरच लग्नसराई सुरू होणार असून, सणोत्सवामुळे बाजारपेठेत सुवर्ण खरेदीकडे ओघ आहे. सणासाठी बाहेरून येणाऱ्या प्रवाशांकडेही दागिने असतात. यामुळे बसस्थानके, रेल्वेस्थानक, बाजारपेठांसहित इतर गर्दीच्या ठिकाणी पोलिसांनी गस्त वाढवली आहे.
नियमित गस्तीसोबतच दिवाळीनिमित्त अधिकची कुमक गस्तीसाठी देण्यात आली आहे. काही ठिकाणी साध्या वेशात पोलिस पायी गस्त घालत आहेत. तर, अंबड-सातपूर या दोन्ही औद्योगिक वसाहतींमध्ये बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.