शहर पोलिस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर २८ ते ३० ऑक्टोबर दरम्यान ३२ व्या घटक पोलिस क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत पोलिस मुख्यालय संघाने उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करून स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारांमध्ये विविध सामने खेळविण्यात आले. यात उस्मानपुरा विभागाने व्हॉलीबॉल, शहर विभागाने कबड्डी, पोलिस मुख्यालयाने व्हॉलीबॉल, तर सिडको विभागाने हँडबॉल स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावले. या स्पर्धंत वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरुष गटातून बाबा मंडलिक यांना उत्कृष्ट खेळाडूचा, तर महिला गटातून सोनाली पवार यांना उत्कृष्ट महिला खेळाडूचा बहुमान प्रदान करण्यात आला.या स्पर्धेच्या समारोप व बक्षीस वितरण समारंभ पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या वेळी पोलिस उपायुक्त शर्मिष्ठा घारगे-वाळवलकर, सहाय्यक पोलिस आयुक्त (प्रशासन) वसुंधरा बोरगावकर, सर्व सहाय्यक पोलिस आयुक्त, तसेच विविध पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, पोलिस अधिकारी, अंमलदार, मंत्रालयीन कर्मचारी व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी राखीव पोलिस निरीक्षक व त्यांच्या संपूर्ण टीमने विशेष परिश्रम घेतले. उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल मा. सहाय्यक पोलिस आयुक्त (प्रशासन) वसुंधरा बोरगावकर यांनी आयोजकांचे कौतुक करून सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलिस अंमलदार आसिफ शेख व कन्नडकर यांनी केले.
रस्सीखेच मध्ये पोलिस अधिकाऱ्यांचे वर्चस्व
या स्पर्धेचे विशेष आकर्षण पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यातील रस्सीखेच स्पर्धा ठरली. या रस्सी खेच स्पर्धेत आधी पोलिस कर्मचाऱ्यांनी चांगलाच जोर लावला. मात्र, पोलिस अधिकारी यांच्या प्रभावी रस्सीखेचमुळे पोलिस कर्मचाऱ्यांची रस्सीखेच स्पर्धेत ताकद कमी पडली. पोलिस अधिकारी संघ या रस्सीखेच स्पर्धेचा विजेता ठरला.
पाल्यांसाठीही घेण्यात आली स्पर्धा
३२ व्या घटक क्रीडा स्पर्धेत पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या पाल्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनीही आपल्या गुणवत्तेचा प्रभाव दाखविला. पाल्यांच्या स्पर्धेसाठी त्यांचे पालकही मैदानावर उपस्थित होते.