‘सावाना’ सभासदत्वाचा मार्ग मोकळा

Contributed by: म. टा. प्रतिनिधी,नाशिक|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘सावाना’ सभासदत्वाचा मार्ग मोकळा
कोणाचे सभासदत्व कमी करून संस्था मोठी होत नाही. न्यायालयीन आदेशामुळे काही जणांचे सभासदत्व रद्द करण्यात आले असले, तरी त्यांनी संस्थेकडे अर्ज करावेत. त्यांची फी आपण स्वत: भरू. त्यांना पुन्हा सभासद करून घ्यावे, अशी शिफारस सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत कार्यकारी मंडळाला केली. त्यामुळे अंतर्गत वादातून सभासदत्व रद्द झालेल्यांच्या सावाना सभासदत्वाचा मार्ग मोकळा झाला आहे.

सार्वजनिक वाचनालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि. १) मु. शं. औरंगाबादकर सभागृहात झाली. सावानाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके अध्यक्षस्थानी होते. ‘वसंत खैरनार, रमेश जुन्नरे यांच्यासारखी माणसे सावानाच्या कार्यकक्षेबाहेर राहणे योग्य नाही. आपण येण्यापूर्वीच न्यायालयीन प्रक्रियेत त्यांचे सभासदत्व रद्द झाले होते. अशा सर्वांनी सावानात अर्ज करावा. त्यांना नव्याने सभासद करून घेतले जाईल. पूर्वलक्षी प्रभावाने सभासदत्व देणे शक्य नाही,’ असे प्रा. फडके म्हणाले. ‘ज्या सभासदांकडे वर्षभरापासून पुस्तके पडून असतील, त्यांचे घटनेतील तरतुदीनुसार सभासदत्व रद्द करण्यासाठी पावले उचलली जातील. पुस्तक मिळवण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला जाईल, पुस्तक गहाळ झाले असल्यास नवी प्रत घेतली जाईल. मात्र, प्रतिसादच न देणाऱ्या सभासदांना सदस्यत्वाला मुकावे लागेल,’ असेही प्रा. फडके यांनी सांगितले. दरम्यान, सुहास भणगे यांनी मुदत ठेवी पंचवीस लाखांनी व शासकीय अनुदान साडेतीन लाखांनी घटल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले. पुस्तके क्रमानुसार लावावीत. सावानाच्या हव्या त्या शाखेत पुस्तक बदलता यावे, अशा सूचना विनोद राठोड यांनी केल्या. महात्मा फुले जन्मद्विशताब्दी व नारायण सुर्वे जन्मशताब्दी असूनही सावानात एकही कार्यक्रम झाला नसल्याबद्दल राजू देसले यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर प्रा. फडके यांनी डिसेंबरमध्ये ग्रंथालय महोत्सवात कार्यक्रम घेण्याची ग्वाही दिली. उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव यांनी स्वागत केले. जयेश बर्वे यांनी दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण केली. संजय करंजकर यांनी इतिवृत्त वाचन केले. गिरीश नातू यांनी अहवाल, सोमनाथ मुठाळ यांनी अंदाजपत्र सादर केले. प्रा. डॉ. सुनील कुटे यांनी आभार मानले. धर्माजी बोडके, जयप्रकाश जातेगावकर, प्रेरणा बेळे, अभिजित बगदे, सुरेश गायधनी, प्रशांत जुन्नरे, मंगेश मालपाठक, भानुदास शौचे उपस्थित होते.
गेल्या मार्चमध्ये सावानात २ लाख ६ हजार ७१४ पुस्तकांची नोंद होती. २० एप्रिलपासून सुरू झालेल्या ग्रंथमोजणीत आतापर्यंत १ लाख २४ हजार ९२५ ग्रंथांची मोजणी झाली आहे. उर्वरित ग्रंथमोजणी तीन महिन्यांत पूर्ण होईल, असे ग्रंथ सचिव देवदत्त जोशी यांनी सांगितले.