सिंहस्थ ध्वजारोहण सोहळा आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यामुळे गुरुवारपासून शनिवारपर्यंत शहरातील प्रमुख बाजारपेठा बंदच राहिल्याने दिवाळीपूर्वीच्या खरेदीचा महत्त्वाचा ‘वीकेंड’ हातचा गेला होता. मात्र, रविवारी (दि. १) बाजारपेठा खुलताच नाशिककरांनी खरेदीचा मुहूर्त अचूक साधला. दुपारी दोननंतर मेनरोड, शालिमार, रविवार कारंजा यांसह उपनगरातील बाजारपेठा आणि मॉल्स ग्राहकांनी फुलून गेल्याचा प्रत्यय आला. त्यावेळी प्रमुख चौकांत पोलिसांनी बॅरिकेडिंग करून गर्दी नियंत्रणाचा प्रयत्न केला.
सात दिवसांवर दिवाळी असल्याने कपडे, फराळ, पूजासाहित्य, आकाशकंदील, पणत्या, रोषणाई, उटणे, वाती, तेल, किराणा, भेटवस्तू यांची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू झाली आहे. सलग तीन दिवस बाजारपेठा बंद राहिल्याने विक्रेत्यांमध्येही खरेदी पर्वाबाबत अनिश्चितता होती. रविवारी (दि. १) सकाळी दहा वाजेपासून बाजारपेठेत गर्दी व्हायला सुरुवात झाली. मात्र, दुपारी चार वाजेपासून ग्राहकांचा ओघ वाढण्यास सुरुवात झाली. दिवाळीपूर्वीचा हा एकमवे रविवार असल्याने नोकरदार, कामगार आणि कुटुंबीयांनी एकाच दिवशी सर्व खरेदी उरकण्यावर भर दिला. मेनरोड आणि शालिमार परिसरात सायंकाळनंतर गर्दी अधिकच वाढली. अनेक दुकानांबाहेर ग्राहकांच्या रांगा दिसत होत्या. तयार फराळ, सजावटीचे साहित्य, कपडे आणि पूजासाहित्य विक्रेत्यांकडे विशेष गर्दी होती. मॉल्समध्येही ब्रँडेड कपडे, गिफ्ट आयटम्स आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील ऑफर्समुळे ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली.उटणे, फराळाचा दरवळ
रविवारी फुललेल्या बाजारात महिलावर्गाचा कल कपडे, फराळ, दागिने आणि गृहसजावटीच्या वस्तू घेण्याकडे दिसून आला. सुट्टीचा दिवस असल्याने ग्राहकांनी गर्दी केली. त्यावेळी बाजारात उटण्याचा सुगंध दरवळला. तयार फराळासह गिफ्ट्स, मिठाई आणि पूजा साहित्य खरेदी करण्यात नाशिककर गुंतल्याचे दिसले.
रविवार ठरला स्वच्छतावार
दिवाळीनिमित्त घरोघरी तीन-चार दिवसांपासून स्वच्छता अभियान सुरू आहे. सलग दोन सुट्ट्या मिळाल्याने वीकेंडला घराची आवरासावर, आकर्षक रोषणाईसह वाहनांची सर्व्हिसिंग करण्यावर भर दिला गेला. घरांमध्ये चिमुकल्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी हातात केरसुणी, कापड, झाडणी घेऊन स्वच्छता केली. सोसायटी आणि संस्थांच्या प्रांगणात स्वच्छता सुरू असल्याचे दिसले. तर, काही ठिकाणी घरांच्या प्रांगणात सुरू असलेली रंगरंगोटी आणि रोषणाईने शहरातील गल्लीबोळा सजण्यास सुरुवात झाल्याचाही प्रत्यय आला.
दुपारी चार वाजेपासून मेनरोड, शालिमारच्या दिशेने ग्राहकांची गर्दी वाढू लागल्यानंतर वाहतूक पोलिसांनी वाहतुकीसाठी बाजारपेठेकडे जाणारे रस्ते बंद केले. सांगली सिग्नल, शालिमार, रविवार कारंजा परिसरातून मेनरोडकडे चारचाकी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला. तसेच बाजारात बेशिस्तरीत्या दुचाकी पार्किंग होऊन वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पेट्रोलिंग व्हॅनद्वारे सूचना केल्या गेल्या. दरम्यान, बाजारात पार्किंगसाठी जागा नसल्याने बी.डी.भालेकर मैदान, नाशिक जिमखाना, नेहरू गार्डन परिसर, सार्वजनिक वाचनालय या ठिकाणी ग्राहकांनी वाहने पार्किंग करत खरेदी केली.