‘...अन्यथा तीव्र आंदोलन करू’

महाराष्ट्र टाइम्स

खरीप हंगामासाठी खतांची ऑनलाइन बुकिंग प्रणाली शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे. अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाइल व इंटरनेटची सोय नाही. यामुळे खत वेळेवर मिळत नाही. प्रणालीतील त्रुटींमुळे गैरप्रकारही वाढले आहेत. ही प्रणाली रद्द न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार तीव्र आंदोलन करेल. शेती उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

preparedness for protests for farmers rights severe threat over online fertilizer booking system

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सुरू केलेल्या खतांच्या ऑनलाइन आगाऊ बुकिंग प्रणालीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत असल्याने सदर प्रणाली तत्काळ रद्द करून पूर्वीप्रमाणे खत खरेदी व्यवस्था सुरू ठेवावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सिल्लोड तालुकाध्यक्ष प्रा. राहुलकुमार ताठे यांनी विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली; तसेच या वेळी मागणीचे निवेदनही अधिकाऱ्यांना देण्यात आले.

प्रा. राहुलकुमार ताठे यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या निदर्शनास आणून दिल्या. शेतकरी हिताच्या दृष्टीने सरकारने तत्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही निवेदनात करण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे, ‘ग्रामीण भागांतील बहुतांश शेतकरी निरक्षर अथवा अल्पशिक्षित आहेत. अनेकांकडे अँड्रॉइड मोबाइल आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत ऑनलाइन बुकिंगची सक्ती करणे अन्यायकारक आहे. संबंधित ॲप आणि सर्व्हर वारंवार बंद पडत असल्याने शेतकऱ्यांना वेळेत खत उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. तातडीने खताची गरज असलेल्या शेतकऱ्यांकडून काही ठिकाणी ऑनलाइन प्रक्रियेचे कारण पुढे करून जादा रक्कम आकारली जात असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत.’

‘सिल्लोड तालुक्यात सुमारे एक लाख १० हजार हेक्टर खरीपयोग्य क्षेत्र असून खत उपलब्धतेमध्ये अडथळे निर्माण झाल्यास मोठ्या प्रमाणावर शेती व उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे,’ असेही निवेदनात नमूद केले आहे.निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या वेळी विजय पवार व इरफान पठाण, योगेश गोराडे , दादाराव गोडसे आदींची उपस्थिती होती.