ऑनलाइन खतविक्री शिथिल करा

महाराष्ट्र टाइम्स

छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यात ऑनलाइन खतविक्री अनिवार्य केली आहे. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी त्रस्त आहेत. आमदार सतीश चव्हाण यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे ही सक्ती शिथिल करण्याची मागणी केली आहे. ग्रामीण भागात इंटरनेटची समस्या आणि सर्व्हर डाऊन असल्याने खत खरेदीत अडथळे येत आहेत. खरीप हंगामासाठी ऑफलाइन खतविक्री सुरू ठेवण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.

ऑनलाइन खतविक्री शिथिल करा
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

राज्य शासनाने छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर या वर्षीपासून ऑनलाइन फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल (खतविक्री अर्ज प्रणाली) खतविक्री अनिवार्य केली आहे. मात्र, या नव्या प्रणालीतील जाचक तांत्रिक अटींमुळे शेतकऱ्यांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ऑनलाईन खत विक्री सक्ती तातडीने शिथिल करावी, अशी मागणी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. मुंबई येथे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन आमदार सतीश चव्हाण यांनी सांगितले की, ‘ऑनलाइन खतविक्री प्रणाली संदर्भात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी निदर्शनास आणून दिल्या. शासनाने खतविक्रीच्या मार्गदर्शनासाठी प्रणाली विकसित केली असती तरी या प्रणालीमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी असल्याने ऐन हंगामात शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी कमतरता, सर्व्हर वारंवार डाऊन होणे यामुळे शेतकऱ्यांना खत खरेदी करताना प्रतीक्षा करावी लागत असल्याचे कृषिमंत्र्याच्या निदर्शनास आणून दिले. या वर्षीच्या खरीप हंगामासाठी ऑफलाइन पद्धतीने खतविक्री सुरू ठेवण्याची मागणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून होत असल्याचे कृषिमंत्र्यांना सांगितले.’ ‘शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन ऑनलाईन खत विक्रीची सक्ती करण्यात येऊ नये. खरीप हंगामासाठी खतविक्री ऑफलाइन पद्धतीने सुरू ठेवण्याची आग्रही मागणी भरणे यांच्याकडे चव्हाण यांनी केली आहे.