कन्नड शहर पोलिस ठाण्याच्या वतीने शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान विनापरवाना वाहन चालविणारे; तसेच ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या चालकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.
या मोहिमेत एकूण ४६ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, संबंधित वाहनचालकांकडून एकूण ६३ हजार५०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
ही कारवाई शहर पोलिस निरीक्षक रघुनाथ सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या वेळी पोलिस उपनिरीक्षक चांद मेंडके, पोलिस उपनिरीक्षक किशोरसिंग जारवाल यांच्यासह पोलिस कर्मचारी विशाल लोंढे, कृष्णा माळी, दत्ता मरकड, दिनेश खेडकर आदी कर्मचारी कारवाईत सहभागी होते. वाहतूक नियमांचे पालन व्हावे आणि अपघातांची संख्या कमी व्हावी या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले.











