खरीप हंगाम तोंडावर आलेला असतानाच कृषी विभागाने खत बुकिंगसाठी सुरू केलेल्या नवीन मोबइल अ ॅपमधील तांत्रिक त्रुटींमुळे शेतकरी आणि कृषी सेवा केंद्रचालक दोघेही प्रचंड अडचणीत सापडले आहेत. या अ ॅपच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामीण भागांतील खत वितरण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. शेतकऱ्यांना तासनतास दुकानांसमोर ताटकळत उभे राहावे लागत आहे. या गंभीर समस्येबाबत पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब तांदळे, भाजपा मंडळ सरचिटणीस राजेंद्र डकले यांनी सोमवारी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना निवेदन दिले; तसेच पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली.
निवेदनात म्हटले आहे, कृषी विभागाच्या या नवीन अ ॅपचा सर्व्हर वारंवार डाउन होत असल्याने खत वितरणाची प्रक्रिया संथ झाली आहे. ऐन पेरणीच्या घाईगडबडीच्या दिवसांत शेतकऱ्यांचा अमूल्य वेळ कृषी केंद्रांवर फेऱ्या मारण्यात वाया जात आहे. केवळ अ ॅप नसल्याने शेतकरी या प्रक्रियेतून बाद होण्याची भीती आहे. गोदामात किंवा दुकानात खत उपलब्ध असूनही अ ॅप चालत नसल्याने ते विकता येत नाही. यामुळे कृषी सेवा केंद्र चालक आणि शेतकरी यांच्यात विनाकारण वाद आणि तणाव निर्माण होत आहे.’
‘खरीप हंगाम हा मर्यादित कालावधीचा असतो. जर शेतकऱ्यांना वेळेवर खते मिळाली नाहीत, तर त्याचा थेट परिणाम पेरणीवर आणि उत्पादनावर होईल, अशी भीती आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाला योग्य ते आदेश द्यावेत आणि शेतकऱ्यांना वेळेत व विनात्रास खत उपलब्ध करून द्यावे,’ अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर बाळासाहेब तांदळे, राजेंद्र डकले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.











