खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सुरू केलेल्या ऑनलाइन खत वितरण प्रणालीमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींबाबत शेतकरी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांसह वैजापूरच्या शिष्टमंडळाने सोमवारी उपविभागीय कृषी अधिकारी आनंद गंजेवार आणि तालुका कृषी अधिकारी व्यंकटेश ठक्के यांना निवेदन दिले.
शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रकाश ठुबे आणि अन्य पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.
‘जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर लागू केलेल्या एफएफएस अँपद्वारे खत बुकिंग करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत. बुकिंग होत नाही; तसेच ओटीपी मिळत नाही. सातत्याने सर्व्हर एरर येत आहे. ॲप वारंवार बंद पडत आहे. या समस्यांमुळे ऐन पेरणीच्या काळात खत खरेदी प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत.
ॲपद्वारे खरेदी करण्याच्या निर्णयाचे संघटना स्वागत करते. मात्र, कोणतीही नवीन प्रणाली राबविताना ग्रामीण भागांतील परिस्थिती व शेतकऱ्यांच्या अडचणींचा विचार होणे आवश्यक आहे,’ अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. काकासाहेब चंदने, विजय काळे, सुनील गिरे, शुभम न्हावले, जुबेर चाऊस, रामकिसन ठेंग, रामेश्वर बोडखे, नंदकुमार मतकर उपस्थित होते.











