केंद्र सरकारने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू केलेल्या पायलट प्रोजेक्टअंतर्गत ऑनलाइन खत बुकिंग प्रणालीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. ऑनलाइन खत बुकिंग प्रणाली बंद करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे करण्यात आली.
जिल्हा परिषद सदस्य केतन काजे यांनी तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाठ यांना निवेदन देऊन केली आहे. निवेदनात म्हटले आहे, ‘केंद्र शासनातर्फे सुरू करण्यात आलेली पायलट प्रोजक्ट (ऑनलाइन बुकिंग) प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये तांत्रिक अडचणी शेतकरी आणि खत विक्रेते या दोघांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या खरी हंगामाची तयारी सुरू आहे. त्यामुळे वेळेवर खत उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक गावांमध्ये इंटरनेटची समस्या असल्यामुळे ऑनलाइन बुकिंग करण्याच्या वेळी अडथळे येत आहेत; तसेच ज्येष्ठ अल्पशिक्षित आणि स्मार्ट फोन वापरतांना ही प्रक्रिया समजून घेणे व पूर्ण करणे कठीण जात आहे.’
‘पेरणीचा हंगामात प्रत्येक दिवस शेतकऱ्यांना महत्त्वाचा आहे. या कामासाठी तीन ते चार वेळेस दुकानावर चकरा माराव्या लागत आहेत. यामध्ये युरियाचीच बुकिंग जास्त होत आहे. संयुक्त खते (एनपीके) अनुदानित खते त्या प्रणालीमध्ये शेतकऱ्यांना कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे; तसेच दुकानदारांकडे आवश्यक खतसाठा उपलब्ध असतांनाही ऑनलाइन प्रक्रियेमुळे त्वरित विक्री करता येत नाही. त्यामुळे शेतकरी यांच्या हितास बाधा निर्माण होत असून, खरीप हंगामामध्ये याचे गंभीर परिणाम होणार आहे. त्यामुळे या प्रणालीमध्ये आवश्यक सुधारणा होईपर्यंत ऑनलाइन बुकिंग प्रक्रिया स्थगिती करण्यात यावी,’ असे नमूद आहे. निवेदन देताना सर्जेराव आव्हाळे, प्रकाश सोनवणे, संजय घुगे, प्रदीप बारगळ, योगेश देशमुख आदी शेतकरी उपस्थित होते.











