‘गुणवंत विद्यार्थी हे फक्त परीक्षेतील गुणांनीच यशस्वी होतात असे नाही तर ते आपल्याला आयुष्यातील चांगल्या सवयीमुळे यशस्वी होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विचारपूर्वक बोलले पाहिजे. भावी आयुष्यात खरेपणा अंगीकारवा,’ असे प्रतिपादन जालना येथील निवृत्त उपप्राचार्य प्रा. बी. वाय. कुलकर्णी यांनी केले.
कन्नड येथे सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय आणि बाळासाहेब पवार फाउंडेशन आयोजित दहावी आणि बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्यात ‘गुणांच्या पलीकडचे यश ’ या विषयावर कुलकर्णी बोलत होते. कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य प्रा. संजय गव्हाणे, वाचनालयाचे सचिव रामकृष्ण पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी बोलताना कुलकर्णी पुढे म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी प्रत्येक टप्प्यावर आपल्या चुका स्वतःहून दुरुस्त करायला हव्यात. आपल्यातील चुका दाखविणारे खरे मित्र सोबत असायला हवेत आणि त्यांचे म्हणणे आपण स्वीकारायला हवे. मुलांनी नेहमीच वर्तमानात जगले पाहिजे. मुलांनी आयुष्यात नेहमी आनंदी राहायला हवे. हे गुण आयुष्यात स्वीकारले तर तुम्ही माणूस म्हणून यशस्वी होऊ शकता.’
या वेळी जिल्हा परिषद सदस्य प्रा.संजय गव्हाणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नगरसेवक युवराज बनकर, प्रा. हुकूमचंद पवार, भूषण जोशी, प्रा. प्रकाश चव्हाण, संजय पाटील, नीलेश काथार, सूरज लांडगे आदींसह गुणवंत विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आकांक्षा श्रीकांत यांनी कार्यक्रमांचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हृषिकेश शिवदे, नरेश सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.











