अकरावी प्रवेशाचा गुंता

Contributed byरजनीकांत गरुड|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अकरावी प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया तांत्रिक अडचणींमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. वेबसाइट ठप्प पडल्याने विद्यार्थी आणि पालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या प्रक्रियेची माहिती नसल्याने त्यांना अधिक त्रास होत आहे. शिक्षण विभागाने यावर तोडगा काढून प्रवेश प्रक्रिया सुलभ करावी अशी अपेक्षा आहे. यामुळे पालकांची होणारी ओढाताण थांबेल.

अकरावी प्रवेशाचा गुंता

करावी ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया यंदाही तांत्रिक अडचणी , बदलांमुळे चर्चेत आली आहे. शिक्षण विभागातर्फे २०२६-२७ शैक्षणिक वर्षातील अकरावी ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया दहा एप्रिलपासून सुरू झाली. दहावी निकालानंतर नोंदणीला गती आली. ११ मेपासून भाग-१ आणि भाग-२ भरून विद्यार्थ्यांना प्रवेश नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर २१ मेपासून पहिल्या प्रवेश फेरीसाठी महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरण्याच्या प्रक्रियेसह नवीन नोंदणी, अर्ज भाग-२ भरण्याची प्रक्रिया सुरू होणार होती. परंतु, फेरीच्या पहिल्याच दिवशी वेबसाइट ठप्प पडली आहे. दहावीचा निकाल लागायच्या अगोदर अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू होते. त्याचा भाग-एक भरायला सुरू करतात; पण त्या अगोदर हे सॉफ्टवेअर या कंपनीने टेस्ट केलेले असते का? कारण कितीही यूजर यावर आपले लॉगिन तयार करतील, हे यांना माहिती असते. एकाच वेळी काही लाख यूजर जरी वापरत असले, तरी हे सॉफ्टवेअर क्रॅश किंवा हळूहळू चालणे, बंद पडणे हे प्रकार व्हायला नको. हे पहिलेच वर्ष नाही, तर दर वर्षी हेच होते. ग्रामीण भागातील पालक/विद्यार्थी या सॉफ्टवेअरशी अवगत असला पाहिजे. त्यांना ही माहिती कशी भरावी, एकूणच हे वापरण्याचे तंत्र या पालक/ विद्यार्थ्यांना माहिती करून द्यावे ही जबदारी कुणाची? तुम्ही म्हणाल मुले मोबाइल वापरतात, त्यांनाही कळते, पण साहेब असे जर झाले असते, तर हे इंटरनेट कॅफेवर का गेले असते. आणि पन्नास, शंभर रुपये का घालवले असते. कॅफेचालकाने त्याचा (विद्यार्थ्यांचा) पासवर्ड दिला, तर ठीक नाही तर त्याला परत पहिल्यापासून, सुरुवात करावी लागते.

त्या मुळे शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचा विचार करावा, नाही तर सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात हिव्यवस्था करताना विद्यार्थ्याला पासवर्ड दिला जात नाही व पसंतीक्रम भरताना आपलेच शाळा/ महाविद्यालय टाकून हा भाग पूर्ण करून घेतला जातो, कारण विद्यार्थ्याला हे भरता येत नाही. त्याची व त्यांच्या पालकाची अशीच अवस्था असते. सॉफ्टवेअर सुरू करण्याचा दिवस आला, की ते बंद पडलेच पाहिजे. ही दर वर्षीची बोंब आहे. यात भरडला जातो तो ग्रामीण पालक. बिचारे अगोदरच पेट्रोल/डिझेल मिळत नाही म्हणून, शेतीची काम होत नाहीत या काळजीत, त्यात पाल्याला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा या साठीची धडपड. याचा कोणी विचारच करीत नाही. खरे तर या वर्षी दहावीचा निकाल असा आहे, की अकरावी प्रवेशाची संख्या जास्त आहे. अशा परिस्थितीत शिक्षण विभागाने सरळ प्रवेश प्रक्रिया राबवून प्रवेश निश्चित करावेत. पालक/विद्यार्थी हव्या त्या महाविद्यालयात/शाळेत जाऊन १० ते १५ मिनिटात आपला प्रवेश घेतो. पालक निश्चिंत होतो. त्याची ओढाताण थांबते.आज सॉफ्टवेअर बंद झाले, उद्या व्यवस्थित चालेल याची काय खात्री? शून्य फेरी संपली, पहिल्याच फेरी अगोदर हे विघ्न. खरे तर मुलाला घरूनच हे करता यावे ही अपेक्षा, पण प्रशिक्षणच नाही. म्हणजे या अडचणी आपणच तयार करायच्या आणि आम्ही सोडवण्यास असमर्थ आहोत हे दाखवायचे. सरळ सॉफ्टवेअर कंपनीवर जबाबदारी ढकलायची, साहेब किती वर्षे ही पिळवणूक होणार? हे थांबणार तरी कधी. ग्रामीण पालक यात होरपळतो आहे. टीव्ही वर, वर्तमान पत्रात, अजून वेगवेगळ्या माध्यमातून या प्रक्रियेचे प्रसार झाला पाहिजे. खूप सोपे आहे हे त्यांना सांगितले गेले पाहिजे. तेव्हाच हे थांबेल. प्रक्रिया अंडर मेंटेनन्स हा मेसेज देऊन सर्वांचेच हाल.

सुटी असतानाही शाळा/ महाविद्यालयाचे शिक्षक प्रवेश व्हावे म्हणून शाळेतच बसून आहेत. सुट्टी असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याची कागदपत्र मिळणे शक्य नाही. तेथे कुणी भेटत नाही. एक दिवस वाढवून प्रश्न सुटणार आहे का? दहावी पास झालेली विद्यार्थी संख्या कमी आणि अकरावीच्या प्रवेशाच्या जागा जास्त. यात महाविद्यालयाची खूप ओढाताण होणार. ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरात येणार नाही. ज्या ठिकाणी त्याला आश्वासन मिळते. त्याच ठिकाणी तो प्रवेश घेणार. आणि हे सर्व ठिकाणी होणारच आहे. शहरातील संख्या कमी होत जाणार, ‘कॉपीमुक्त’सह इतर कारणांमुळे निकाल कमी आहे. भाग-एक, भाग-दोन, महाविद्यालयाचे पर्याय हे दुसऱ्या, तिसऱ्या फेरीपर्यंत चालणार, तरी काहींना आपल्या पसंतीचे महाविद्यालयात मिळणारच नाही; मग परत जो येईल त्याला प्रवेश हे मागच्यासारखेच होणार मग या प्रक्रियेचा नेमका उद्देश काय?

(लेखक देवगिरी कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य आहेत.)