‘नीट’ मध्ये विद्यार्थीस्नेही बदल

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुढील रविवारी होणाऱ्या नीटच्या फेरपरीक्षेसाठी राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) महत्त्वाचे बदल केले आहेत. परीक्षा कालावधी वाढवण्यात आला असून, विद्यार्थ्यांना आकडेमोड करण्यासाठी प्रश्नपुस्तिकेत आता चार अतिरिक्त पाने मिळणार आहेत. डावखुऱ्या विद्यार्थ्यांचाही विचार करण्यात आला आहे. हे बदल २१ जून रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी लागू असतील.

‘नीट’ मध्ये विद्यार्थीस्नेही बदल

पुढील रविवारी, २१ जून रोजी होणाऱ्या ‘नीट’च्या फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) शुक्रवारी विद्यार्थीस्नेही बदल जाहीर केले. त्यानुसार विद्यार्थ्यांना परीक्षा कालावधी वाढवून देण्यात आला असून, कच्च्या कामासाठी याआधी प्रश्नपुस्तिकेत असलेल्या दोन पानांची संख्या आता चार करण्यात आली आहे.

‘एनटीए’तर्फे जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार उमेदवारांकडून गेल्या काही वर्षांत प्राप्त झालेल्या सूचनांच्या आधारे परीक्षा कालावधी १९५ मिनिटांपर्यंत वाढविण्यात आला आहे. २१ जून रोजी दुपारी दोन ते सायंकाळी ५.१५ या वेळेत ही परीक्षा होईल. अतिरिक्त वेळेत उपस्थिती पत्रकावर स्वाक्षरी, तपासणी आणि इतर अनिवार्य प्रशासकीय प्रक्रिया यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रश्नपत्रिकेच्या मांडणीतही बदल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान आकडेमोड करायची असेल किंवा इतर काही नोंदी करायच्या असतील तर त्यासाठी चार अतिरिक्त पाने प्रश्नपत्रिकेला जोडण्यात येणार आहेत. कच्च्या कामासाठी या पानांची यापूर्वी संख्या दोन असायची. त्यात वाढ केली आहे. त्यातील पहिली दोन पाने प्रश्नपत्रिकेच्या सूचनावलीनंतर लगेचच असतील आणि उर्वरित दोन पाने प्रश्नपत्रिकेच्या अखेरीस असतील. विशेषतः डावखुऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे ‘एनटीए’ने स्पष्ट केले आहे.