रतीय संस्कृती ही केवळ धर्म, सण आणि परंपरांनी घडलेली नाही; ती भावनांनी विणलेली संस्कृती आहे. येथे कला ही फक्त सजावट नसते, तर ती माणसांना जोडणारी भाषा असते. पूर्वीच्या काळी घरातील स्त्रिया हाताने जे काही निर्माण करीत असत, त्यामध्ये केवळ कौशल्य नसे; तर त्यात प्रेम, काळजी, आठवणी, त्याग आणि नात्यांची ऊब मिसळलेली असे. म्हणूनच भारतीय पारंपरिक कला या केवळ कलाकृती नसून, त्या एका जिवंत कुटुंबाच्या भावविश्वाचे दर्शन घडवतात.
आजच्या आधुनिक काळात वस्तू सहज विकत मिळतात; पण पूर्वी प्रत्येक वस्तूच्या मागे एखाद्या व्यक्तीचा वेळ, श्रम आणि भावना गुंतलेल्या असत. घरातील गोधडी असो, रांगोळी असो, भरतकाम असो किंवा लोकगीत. प्रत्येक गोष्ट घराला घरपण देत असे.
दर वर्षी नवरात्र सुरू होण्यापूर्वी घराघरांत स्वच्छतेची लगबग सुरू होत असे. जुन्या सतरंज्या, पांघरूणं धुतली जात; भांडी-कुंडी घासून चकचकीत केली जात. घर आवरताना एखाद्या स्त्रीच्या हाताला वरच्या कपाटात ठेवलेली जुनी गोधडी लागे आणि क्षणभरासाठी वेळ थांबून जाई. आई आणि आजीच्या जुन्या रेशमी साड्यांपासून शिवलेली ती गोधडी... जागोजागी फाटलेली, रंग उडालेली; पण अजूनही मायेचा सुगंध जपून ठेवलेली.
ती गोधडी अंगावर घेतली, की जणू आईच कुशीत घेत आहे, असा भास होत असे. त्या गोधडीवर भावंडांच्या गप्पा रंगल्या होत्या, आजीच्या गोष्टी ऐकत नातवंडं झोपली होती, थंडीच्या रात्री अंगाई गीतांची ऊब अनुभवली होती. गोधडी शिवणे ही केवळ गरज नव्हती; ती तुटलेल्या कपड्यांना जोडताना नातेसंबंध अधिक घट्ट विणण्याची कला होती. प्रत्येक टाका म्हणजे एखाद्या आठवणीची खूण होती.
पूर्वीच्या काळी मुला-मुलींची लग्ने लवकर होत असत. मुले आणि सुना संसाराची जबाबदारी सांभाळू लागली, की घरातील ज्येष्ठ मंडळी तीर्थयात्रेला निघत. त्या काळी प्रवास खूप कठीण असे. त्यामुळे त्यांच्या सुखरूप परतीसाठी घरातील स्त्रियांच्या मनात सतत प्रार्थना असायची.
मध्य प्रदेशातील मालवा भागात ‘पथवारी’ नावाची सुंदर परंपरा होती. सुना घराबाहेर कुंकवात हात बुडवून पावलांचे ठसे उमटवत. विशेष म्हणजे ती पावलं फक्त जाण्याची नसत, तर परत येण्याचीही असत. त्या लाल कुंकवाच्या पाऊलखुणांमध्ये एक हळवी विनंती दडलेली असे.
‘तुम्ही सुखरूप परत या... आम्ही तुमची वाट पाहत आहोत.’
तीर्थयात्रेला निघालेल्या सासऱ्यांना उद्देशून सुना पथवारी गीते गात. त्या गीतांमध्ये त्या म्हणत...
‘बनारस के घाटों से, हरी हरी चुडियाँ लाना,
मीठी मिठाई भी ले आना पर ससूरजी,
सकुशल लौट आना...’
या गीतांमध्ये वस्तूंची मागणी असली, तरी खरी भावना भेटवस्तूंची नव्हती; ती होती आपल्या माणसांच्या सुरक्षित परतीची. किती सुंदर होती ती प्रतीक्षा... किती निरागस होते ते प्रेम.
पंजाबमधील ‘फुलकारी’ ही कलादेखील अशाच मायेच्या धाग्यांनी विणलेली आहे. मुलगी जन्माला आली, की तिच्या लग्नासाठी आई, आजी आणि घरातील स्त्रिया फुलकारी भरायला सुरुवात करीत. रंगीबेरंगी धाग्यांनी भरलेली ती ओढणी म्हणजे माहेरच्या प्रेमाची सावली होती. भरतकाम करता करता स्त्रियांच्या गप्पा रंगत, संसाराचे धडे दिले जात, लोकगीते म्हटली जात. मुलगी जेव्हा लग्नानंतर ती फुलकारी अंगावर घेई, तेव्हा ती फक्त वस्त्र नसे; तर आईच्या हाताचा स्पर्श सोबत घेऊन ती नव्या आयुष्यात प्रवेश करीत असे.
हिमाचल प्रदेशातील ‘चंबा रुमाल’ ही तर भावनांची नाजूक वीण आहे. साध्या कापडावर रेशमी धाग्यांनी रामायण, रासलीला किंवा कौटुंबिक प्रसंग भरले जात. पण, त्या धाग्यांमध्ये आईचे मन विणलेले असे. मुलगी सासरी जाताना आई तिच्या हातात चंबा रुमाल देत असे. कधी सासरी मन भरून आले, की मुलगी तो रुमाल हातात घ्यायची आणि त्या धाग्यांवरून हात फिरवत राहायची. तिला जणू आईचाच हात डोक्यावर असल्याचा भास व्हायचा.
राजस्थानच्या गावांमधील आरशांची कलादेखील तितकीच भावस्पर्शी आहे. वाळवंटाच्या कोरड्या प्रदेशात स्त्रिया मातीच्या भिंतींवर छोटे छोटे आरसे बसवून, सुंदर नक्षीकाम करीत. सूर्यकिरण त्या आरश्यांवर पडले, की घर उजळून निघत असे. नवीन सून घरात येणार असली, की सासू प्रेमाने भिंती सजवत असे. तिच्या मनात एकच भावना असे, ती म्हणजे ‘या लेकराला परकेपणा वाटू नये.’
संध्याकाळी घरात दिवे लागले, की त्या आरश्यांमध्ये प्रकाश चमकू लागे. त्या भिंतींनी कितीतरी आनंदाचे क्षण पाहिलेले असत.
भारतीय घरांमध्ये रांगोळीलादेखील विशेष स्थान होते आणि आहे. पहाटे उठून अंगण झाडणे, सारवणे आणि रांगोळी काढणे ही केवळ परंपरा नव्हती; ती घरात सकारात्मकता आणण्याची पद्धत होती. दारातील रांगोळी पाहून घरात येणाऱ्या व्यक्तीच्या मनातील कटुता दूर व्हावी, घरात आनंदाने प्रवेश व्हावा, अशी भावना त्यामागे असे. दक्षिण भारतातील ‘कोलम’ परंपरेत तर प्रत्येक घराची स्वतःची नक्षी असे, जी पिढ्यान् पिढ्या पुढे जात असे.
भारतीय स्त्रियांसाठी कविता, ओव्या, अंगाईगीते आणि भरतकाम हे भावना व्यक्त करण्याचे माध्यम होते. एखादी आई आपल्या मुलीचे पोर्ट्रेट सुई-धाग्यांनी कापडावर विणत असे आणि त्यासोबत कविता लिहीत असे...
‘उद्या कदाचित मी नसेनही,
पण या प्रत्येक धाग्यातून
तुला मी भेटत राहीन...’
या ओळी फक्त कविता नव्हत्या; त्या आईच्या अंतःकरणातून उमटलेली अमर भावना होती.
घर फक्त विटा आणि भिंतींनी बनत नाही. घर बनते ते प्रेमाने जपलेल्या भावनांनी. गोधडीतील टाके, फुलकारीतील धागे, चंबा रुमालातील नक्षी, पथवारीतील पाऊलखुणा, रांगोळीतील रंग आणि राजस्थानच्या आरश्यांतील चमक - या सर्वांमध्ये एकच गोष्ट जिवंत आहे, ती म्हणजे माणसांना प्रेमाने जोडून ठेवण्याची कला.











