मुंढवा पोलिसांनी हडपसर, फुरसुंगी आणि भेकराईनगर परिसरातील पाच ठिकाणी १७ तास छापेमारी करून ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणारे हायटेक कॉल सेंटर उद्ध्वस्त केले. या कारवाईत दोन सूत्रधारांना अटक करण्यात आली असून, अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे, बनावट कागदपत्रे, बँक खात्यांची माहिती, रोख रक्कम तसेच एक पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये संतोष दत्ता वेंजणेकर (वय ४७, रा. भेकराईनगर, फुरसुंगी) आणि विनायक ऊर्फ दीपक मनोहर इक्के (वय ४०, रा. फुरसुंगी) यांचा समावेश आहे. तपासात प्रमुख सूत्रधार अमित मजेटिया हा दुबईत असल्याचे, तर भागिरथ पांड्या आर्थिक व्यवहार सांभाळत असल्याचे समोर आले असून त्यांचा शोध सुरू आहे. याशिवाय कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या निदा अन्सारी, पूनम भालके, अनुजा जाधव, रवींद्र कुरळे, अक्षय पाटील, विवेक जाधव, प्रांजल मिश्रा आणि सागर उसरे यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमनोरा चेंबर्स, अमनोरा मॉल तसेच फुरसुंगी परिसरातील कार्यालयांमधून नागरिकांना फोन करून ऑनलाइन गेमिंगमध्ये सहभागी होण्यास प्रवृत्त केले जात होते. सुरुवातीला काही गेममध्ये जिंकू देऊन विश्वास संपादन केला जात होता. त्यानंतर मोठ्या रकमांची गुंतवणूक करण्यास भाग पाडून आर्थिक फसवणूक केली जात होती. पैसे गमावल्यानंतर ते परत मिळवून देण्याचे आमिष दाखवून पुन्हा रक्कम उकळण्याचाही प्रकार सुरू होता.
मुंढवा पोलिसांनी केलेल्या कारवाईमागे जवळपास १५ दिवसांचा गुप्त तपास असल्याची माहिती समोर आली आहे. हवालदार शिवाजी जाधव आणि पोलिस अंमलदार योगेश राऊत यांना काही दिवसांपूर्वी ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या रॅकेटच्या माध्यमातून पुण्यासह देशभरातील नागरिकांना लक्ष्य केले जात असल्याचे स्पष्ट झाले. रोज तीनशे- चारशे नागरिकांची या माध्यमातून फसवणूक होत होती, अशी माहिती समोर आली.