ला उद्या मुंबईला जायचं आहे, कुरिअर घेऊन. तुझं फ्लाइटचे तिकीट तयार आहे,’ मॅनेजरने सदूला सांगितले. तोंडाचा आ वासून सदूने मॅनेजरकडे बघितले. सदू एक साधा माणूस, घरची परिस्थिती जेमतेम. दहा वर्षांपूर्वी बारावी झाल्यावर तो कुरिअरच्या ऑफिसमध्ये कामाला लागला होता. ऑफिस चक्क त्याला स्वतःच्या खर्चाने, विमानातून मुंबईला पाठवत होते. सदूला अतिशय आनंद झाला.
विमानातून जायचे म्हणजे टापटीपपणा पाहिजे. सदूजवळ दोनच शर्ट-पँट होते. त्यामुळे त्याने मार्केट गाठले. ‘विमानात आपण चांगले दिसले पाहिजे,’ या विचाराने त्याने तब्बल चार हजारांची पँट आणि अडीच हजार रुपयांचा शर्ट खरेदी केला. अशी महागडी शॉपिंग त्याने आयुष्यात पहिल्यांदाच केली होती. ठरलेल्या दिवशी नवीन कपडे परिधान करून तो विमानतळावर पोचला. तिथली झगमग, हवाई सुंदरींचे आदरातिथ्य या गोष्टींनी तो भारावून गेला.
मुंबईला उतरताच त्याने कुरिअर डिलिव्हर केले आणि तो मुक्कामाच्या भव्य हॉटेलमध्ये दाखल झाला. वातानुकूलित रूम, ऐसपैस बेड आणि पॉश बाथरूम बघून सदू हरखून गेला. बाथटबमध्ये मनसोक्त डुंबण्याचा आनंद घेतल्यानंतर त्याची नजर बाथरूममध्ये ठेवलेल्या एका वस्तूकडे गेली. तो एक सुंदर, छोटा पॉकेट कंगवा होता, ज्यावर हॉटेलचे नाव कोरलेले होते. सदू त्याच्या प्रेमातच पडला. हा कंगवा आपल्याकडे ठेवावा असा विचार त्याच्या मनात आला. ‘छे! ही तर चोरी होईल,’ त्याचा पापभीरू माणूस जागा झाला. पण, ‘इतक्या मोठ्या हॉटेलमधून कंगवा घेणे म्हणजे समुद्रातून ओंजळभर पाणी घेण्यासारखे आहे,’ या विचाराने मोहाने नैतिकतेवर मात केली. सदूने तो कंगवा हळूच आपल्या बॅगमध्ये टाकला.
परतीच्या प्रवासासाठी सदू रिसेप्शन काउंटरवर पोहोचला. रिसेप्शनिस्टने सेवकाला रुम चेक करण्यासाठी पाठवले. हे पाहून सदूच्या घशाला कोरड पडली. ‘आता आपली बॅग तपासली जाणार आणि सर्वांसमोर इज्जतीचे धिंडवडे निघणार, या भीतीने त्याचे मन त्याला खाऊ लागले. पण सेवकाने सर्व काही ठीक आहे, असा इशारा केला आणि सदूचा जीव भांड्यात पडला.
तो तडक विमानतळावर पोहोचला. सुरक्षा तपासणीच्या रांगेत बॅग एक्स-रे यंत्रात टाकताना पुन्हा भीतीने त्याच्या मनावर पकड घेतली. कंगवा चाकूच्या आकाराचा असल्याने सुरक्षारक्षकाला संशय येईल आणि चोरीचे बिंग बाहेर पडेल, असे त्याला वाटू लागले. अचानक, ‘ये किसका बॅग है?’ असा आवाज आला. सदूच्या पोटात गोळा आला, पण ती बॅग दुसऱ्याची होती. सदूने सुटकेचा नि:श्वास सोडला आणि तो विमानात दाखल झाला.
त्याच्या शेजारच्या सीटवर एक जटाधारी, अध्यात्माचा अभ्यास करणारे बाबा येऊन बसले. विमानाने आकाशात झेप घेतल्यावर दोघांचे संभाषण सुरू झाले. सदूने बाबांना आपला हात दाखवला. बाबा हाताकडे बघत म्हणाले, ‘प्रारब्ध चांगलं आहे तुमचं. प्रारब्ध म्हणजे मागच्या जन्मातील पाप-पुण्याचे फलित.’ सदूने बॅगमधील कंगवा चाचपत विचारले, ‘आणि या जन्मात केलेल्या पापाचे फलित?’ बाबा म्हणाले, ‘ते पुढच्या जन्मात मिळू शकते.’ सदूने स्वतःला समजावले, ‘कंगवा चोरल्याचे पाप पुढच्या जन्मात बघू, आज काळजी नको.’
विमान लँडिंग झाल्यावर दोघेही बाहेर पडले. बाबांना घेण्यासाठी गाडी आली होती. कारमध्ये बसता बसता बाबा थबकले आणि म्हणाले, ‘अरे हो! एक संकल्पना आहे, जिला ‘ इन्स्टंट कर्मा ’ म्हणतात. यात या जन्मी केलेल्या पापाचे फळ याच जन्मी तात्काळ मिळते.’ बाबा निघून गेले, पण सदू अस्वस्थ झाला. त्याने बॅगमधून कंगवा काढून पँटच्या मागच्या खिशात ठेवला आणि विचार करीत बाकावर बसला.
बाकावर बसताच टरकन आवाज झाला आणि सदूला काहीतरी टोचले. त्याने उभे राहून पाहिले, तर कंगवा तुटून त्याचे दोन तुकडे झाले होते आणि त्याची तब्बल चार हजार रुपयांची नवी कोरी पँट खिशासहित फाटली होती! तुटलेल्या कंगवा डस्टबीनमध्ये फेकून, फाटलेल्या पँटवर हात फिरवत तो पुटपुटला, ‘इन्स्टंट कर्मा , दुसरे काय?’ आणि घराच्या दिशेने चालू लागला.











