त्रपती संभाजीनगर शहर आज एका निर्णायक टप्प्यावर उभे आहे. शहर आणि सभोवतालच्या गावांची एकत्रित लोकसंख्या २० लाखांच्या पार गेली आहे. एकीकडे औद्योगिक गुंतवणुकींचा वाढता वेग, पर्यटन, शिक्षण आणि रोजगाराच्या नव्या संधी; तर दुसरीकडे दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली वाहतूक कोंडी, अपुरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि वाहनकेंद्री शहरी विकास... आज शहरातील प्रत्येक नागरिक वाहतूक समस्येबद्दल बोलतो, पण आपण मागणी नेमकी कशाची करतो? ‘रस्ते रुंद करा’ ही मागणी खरोखरच भविष्यासाठी योग्य उपाय आहे का?
खरे तर, आपल्याला केवळ रुंद रस्ते नकोत; आपल्याला सर्वांसाठी सक्षम स्मार्ट रस्ते हवे आहेत. असे रस्ते, जे फक्त वाहनांसाठी नव्हे, तर पादचारी, सायकलस्वार, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, व्यापारी आणि सार्वजनिक वाहतूक वापरणाऱ्या लाखो नागरिकांसाठी सुरक्षित आणि सुलभ असतील.
शहरातील एकूण भूभागापैकी जवळपास २० टक्के पेक्षा जास्त जागा रस्ते व्यापतात. म्हणजेच रस्ते हे शहरातील सर्वांत मोठे सार्वजनिक क्षेत्र असते. मात्र, दुर्दैवाने आपण रस्त्यांकडे केवळ वाहनांच्या हालचालीचा मार्ग म्हणून पाहिले. परिणामी पादचारी अदृश्य झाले, सायकल संस्कृती संपली आणि सार्वजनिक वाहतुकीकडे दुर्लक्ष झाले.
जगभरातील शहरांनी आता ‘वाहनकेंद्री’ नव्हे, तर ‘माणूसकेंद्री’ वाहतूक नियोजन स्वीकारले आहे. कारण रस्ते रुंद केल्याने वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सुटत नाही. उलट अधिक रस्ते म्हणजे अधिक खासगी वाहने. काही वर्षांत पुन्हा तेच चित्र - वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि ताण.
छत्रपती संभाजीनगरमध्येही हीच परिस्थिती निर्माण होत आहे. अथर, जेएसडब्ल्यू, टोयोटासारख्या मोठ्या औद्योगिक गुंतवणुका, शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्र, वाळूज, जालना औद्योगिक पट्टा, पर्यटन आणि वाढते शहरीकरण यांमुळे पुढील दशकात शहरावर वाहतुकीचा प्रचंड ताण येणार आहे. त्यामुळे आज घेतलेले निर्णय पुढील ५० वर्षांचे भविष्य ठरवणार आहेत.
‘महामेट्रो’ आणि विविध संस्थांनी तयार केलेल्या व्यापक गतिशीलता आराखड्यात शहरासाठी काही अत्यंत महत्त्वाच्या बाबी अधोरेखित केल्या आहेत. त्यानुसार शहरातील ८० टक्के वाहने दुचाकी आहेत, सार्वजनिक वाहतुकीचा वापर अत्यंत कमी आहे, तर अनेक रस्त्यांवर पदपथच नाहीत. शहरातील वाहतुकीची वाढ झपाट्याने होत असून, भविष्यात खासगी वाहनांवरील अवलंबित्व आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेने अलीकडच्या काळात काही अत्यंत महत्त्वाची आणि दूरदृष्टीची पावले उचलली आहेत. जालना रोड, हर्सूलकडे जाणारा जळगाव रोड, दौलताबाद रोड ते पडेगाव परिसर, पैठण रोड; तसेच वाळूजकडे जाणारा ६० मीटर रस्ता या प्रमुख मार्गांवर अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करण्याचे काम हाती घेण्यात आले. ही केवळ वाहतूक सुधारणा नसून, भविष्यातील ‘स्मार्ट स्ट्रीट’ संकल्पनेची सुरुवात मानली पाहिजे. मात्र, हे काम केवळ रस्ते रुंद करण्यापुरते मर्यादित राहू नये. या मार्गांचे रूपांतर ‘स्मार्ट स्ट्रीट’मध्ये होणे अत्यावश्यक आहे. म्हणजेच...
सुरक्षित आणि सलग फूटपाथ
सायकल ट्रॅक
समर्पित सार्वजनिक वाहतूक मार्ग
हरित पट्टे
स्मार्ट पार्किंग
भूमिगत युटिलिटी व्यवस्था
दिव्यांगांसाठी सुलभ सुविधा
पादचारी क्रॉसिंग
स्मार्ट सिग्नल प्रणाली
या सर्व बाबींचा समावेश असलेले रस्ते उभारणे ही काळाची गरज आहे.आज शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर पादचारी चालण्यासाठी जागाच नाही. परिणामी नागरिकांना वाहनांच्या मधून जीव धोक्यात घालून चालावे लागते. व्यापक गतिशीलता आराखड्यानुसार शहरातील मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर पदपथ सुविधा उपलब्ध नाहीत. हे चित्र बदलण्यासाठी आता प्राधान्याने काम करण्याची गरज आहे.
तितकेच महत्त्वाचे म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करणे. फक्त खासगी वाहनांवर आधारित विकास कोणत्याही शहरासाठी टिकाऊ ठरत नाही. बस रॅपिड ट्रान्झिट व्यवस्था, मेट्रो निओ, विद्युत बस, मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट हब आणि शहराच्या सर्व भागांना जोडणारी जलद सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारणे अत्यावश्यक आहे.
आज छत्रपती संभाजीनगरची वाढ महापालिका हद्दीपुरती मर्यादित राहिलेली नाही. शेंद्रा, वाळूज, चिकलठाणा, मुकुंदवाडी, सातारा-देवळाई, पडेगाव, बिडकीन, पैठण रोड आणि आसपासची गावे शहराच्या विकासाचा अविभाज्य भाग बनत आहेत. त्यामुळे आता ‘छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक महानगर विकास प्राधिकरण’ अर्थात ‘सीएसएमआरडीए’ कार्यान्वित करून, संपूर्ण प्रदेशाचे एकत्रित नियोजन करण्याची वेळ आली आहे. हे नियोजन केवळ वाहतुकीपुरते नसावे; तर उद्योग, निवास, पर्यावरण, जलव्यवस्था, पर्यटन आणि सार्वजनिक वाहतूक यांचा समन्वय साधणारे असावे. कारण पुढील पिढ्यांसाठी सक्षम, आधुनिक आणि शाश्वत छत्रपती संभाजीनगर उभारायचे असेल, तर आजच व्यापक आणि धाडसी नियोजन करावे लागेल.
रस्ते हे फक्त वाहनांसाठी नसतात. ते शहराची ओळख असतात. ते संस्कृती घडवतात. अर्थव्यवस्था चालवतात. लोकांना जोडतात. त्यामुळे आता प्रश्न ‘रस्ते किती रुंद?’ याचा नाही; तर ‘रस्ते किती सर्वसमावेशक?’ याचा आहे आणि म्हणूनच कदाचित, इतिहास, उद्योग, संस्कृती आणि दूरदृष्टी यांचा संगम असलेले छत्रपती संभाजीनगर हे भारतातील पुढचे महानगर ठरू पाहत असेल, तर आजच शहराच्या सर्वसमावेशक मोबिलिटी प्लॅनबाबत मोठी पावले टाकली पाहिजेत.











