मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी उकाडा असह्य होत असतानाच गेल्या दोन महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसामुळे तब्बल ५९ हजार १२३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. २४ जिल्ह्यांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांसमोर नवे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
कृषी विभागाने १ मे ते १० जून या कालावधीतील नुकसानाचा आढावा घेतला असून, या काळात वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि काही भागांत गारपिटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. चोवीस जिल्ह्यांतील एकूण बाधित क्षेत्र ५९,१२३ हेक्टरपर्यंत पोहोचले असून, त्यापैकी जूनच्या पहिल्याच आठवड्यात दहा जिल्ह्यांतील १८,९०८ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याची नोंद आहे.
नुकसानग्रस्त जिल्ह्यांमध्ये जळगाव अव्वल ठरला आहे. जळगाव जिल्ह्यात ५,४७१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून केळी उत्पादक पट्ट्याला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्याखालोखाल बुलडाणा जिल्ह्यात ४,९८१ हेक्टर, सोलापूर जिल्ह्यात ४,११० हेक्टर आणि अकोला जिल्ह्यात १,३१४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. पुणे जिल्ह्यातही १,७४४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याची नोंद आहे.
पीकनिहाय विचार केल्यास केळी या पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्याशिवाय कांदा, द्राक्ष, डाळिंब, संत्रा, मोसंबी, आंबा, पपई, लिंबू, हरभरा, मका आणि भाजीपाल्यालाही मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यामुळे केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या.
सर्वाधिक फटका बसलेली पिके केळी, कांदा, द्राक्ष, डाळिंब, संत्रा, मोसंबी, आंबा, पपई, लिंबू, पेरु आणि भाजीपाला











