कांदा खरेदी दरातसरकारने केली वाढ

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सरकारने शेतकऱ्यांसाठी कांद्याचा खरेदी दर वाढवला आहे. महाराष्ट्रातील शेतकरी अधिक दराची मागणी करत आहेत. सलमान खानच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे. गोदावरी पाणीवाटपावर महाराष्ट्र आणि तेलंगण यांच्यात मध्यस्थी करण्याची विनंती पंतप्रधानांना करण्यात आली आहे. सीबीएसई परीक्षेतील त्रुटी दाखवणाऱ्या निसर्ग अधिकारीला आयआयटी कानपूरने नोकरी दिली आहे. ईडीने वीणा टी. यांना पुन्हा समन्स बजावले आहे.

कांदा खरेदी दरातसरकारने केली वाढ

नवी दिल्ली : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारने आपल्या बफर स्टॉक कार्यक्रमांतर्गत कांद्याचा खरेदी दर शनिवारपासून (दि. १३ जून) सध्याच्या प्रतिकिलो १५ रुपये ८० पैशांवरून प्रतिकिलो १६ रुपये ५० पैसे केला आहे. देशातील सर्वाधिक कांदा उत्पादक प्रदेश असलेल्या महाराष्ट्रात उत्पादन खर्च अधिक असल्याने राज्यातील शेतकरी प्रतिकिलो ३० रुपये खरेदी दराची मागणी करीत आहेत. बाजार हस्तक्षेपाच्या उद्देशाने किंमत स्थिरीकरण निधी (पीएसएफ) अंतर्गत दरवर्षी बफर स्टॉक राखला जातो.

निर्मात्यांना नोटीस

नवी दिल्ली : ‘काला हिरण: द बॅटल फॉर लीगल’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या अभिनेता सलमान खानच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी चित्रपटनिर्मात्यांची भूमिका जाणून घेतली. हा चित्रपट कथितरीत्या सलमानशी संबंधित काळवीट शिकार प्रकरणावर आधारित असून, त्याच्या व्यक्तिमत्त्व हक्कांच्या संरक्षणाबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणारा आहे, असा युक्तिवाद सलमानच्या वकिलांनी केला.

‘मध्यस्थी करा’

नवी दिल्ली : गोदावरी पाणीवाटप वादाबाबत महाराष्ट्र आणि तेलंगण यांच्यात मध्यस्थी करून वाटाघाटी घडवून आणाव्यात, अशी विनंती तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. निती आयोगाच्या बैठकीसाठी ते दिल्लीत होते. राज्यातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या भविष्यातील गरजांसाठी गोदावरीचे पाणी अत्यंत महत्त्वाचे आहे, याकडे रेड्डी यांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधले.

निसर्गला नोकरी

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) परीक्षेतील ऑन स्क्रीन मार्किंग (ओएसएम) प्रणालीतील त्रुटी दाखवून देणारा १९ वर्षांचा निसर्ग अधिकारी याला ‘आयआयटी, कानपूर’ने थेट नोकरी दिली आहे. निसर्गला ओपन सोर्स इंटेलिजन्स आणि थ्रीट इंटेलिजन्स इंजिनीअर म्हणून ‘आयआयटी’ने नोकरी देऊ केली आहे.

पुन्हा समन्स

कोची : ‘सीएमआरएल’ या खनिज कंपनीशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणाचा तपास करत असलेल्या ईडीने केरळचे माजी मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांच्या कन्या वीणा टी. यांना नव्याने समन्स बजावले असून, १७ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती सूत्रांनी शुक्रवारी दिली.

इराणींचे नाव गायब

अमेठी : माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे नाव अमेठीच्या लोकसभा आणि विधानसभा मतदारयाद्यांमध्ये असूनही, अमेठी जिल्ह्यातील मेदन मवई गावाच्या पंचायत मतदारयादीतून वगळण्यात आले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असे अमेठीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. इराणी या गौरीगंज मतदारसंघातील मेदन मवई गावातून मतदार म्हणून नोंदणीकृत आहेत.