विद्यार्थ्यांसाठी‘सेतू अभ्यास’

महाराष्ट्र टाइम्स

राज्यात नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. इयत्ता तिसरी, चौथी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २१ दिवसांचा 'सेतू अभ्यास' शाळा सुरू होताच सुरू होईल. हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर नियमित अध्यापन सुरू होईल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत हा बदल करण्यात आला आहे. सेतू अभ्यास पुस्तिका शाळांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.

new setu abhyas system launched for students

राज्यात नव्या अभ्यासक्रमाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुरू असतानाच, विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील बदल सहज लक्षात यावेत, यासाठी यंदा शाळा सुरू होताच ‘ सेतू अभ्यास ’ राबविण्यात येणार आहे. इयत्ता तिसरी, चौथी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा २१ दिवसांचा अभ्यासक्रम असून तो पूर्ण झाल्यानंतर नियमित अध्यापनाला सुरुवात होणार आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी) अंमलबजावणीअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीसाठी नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे. यापैकी तिसरी, चौथी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सेतू अभ्यासाची अंमलबजावणी केली जाणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) यांनी राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये हा अभ्यासक्रम शाळा सुरू झाल्यानंतर राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. सेतू अभ्यास पुस्तिका राज्यातील शासकीय व खासगी अनुदानित शाळांना उपलब्ध करून देण्यात येत असून, अभ्यासक्रमाची पीडीएफ प्रत एससीईआरटीच्या वेबसाइटवरही उपलब्ध करण्यात आली आहे.