अमेरिका-इराण युद्ध समाप्तीसाठीचा करार जवळपास पूर्ण झाला असून, त्यावर आठवड्याअखेरीस युरोपमध्ये स्वाक्षरी करण्यात येईल, अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी केली. सुमारे दोन महिन्यांच्या वाटाघाटीनंतर अमेरिका-इराण यांच्यात हा शांतता करार होणार असला, तरी इराणने होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण आणि अणुकार्यक्रमाचा हक्क अबाधित राहणार असल्याचा दावा केल्याने कराराबाबत संभ्रमावस्था कायम आहे.
खार्ग बेटासह इराणचे तेल प्रकल्प ताब्यात घेण्याचा इशारा देणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी काही तासांतच इराणवरील हल्ले थांबवण्याचा निर्णय घेत युद्ध थांबवण्यात येत असल्याचे गुरुवारी जाहीर केले. उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स हे युरोपमध्ये जाऊन आठवड्याअखेरपर्यंत करारावर स्वाक्षरी करतील, असे ट्रम्प यांनी ‘ओव्हल ऑफिस’मध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले. शांतता कराराच्या वाटाघाटींबाबत कतार, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, बहरिन, कुवेत आणि पाकिस्तान आदींसह पश्चिम आशियातील देशांतील नेत्यांशी चर्चा केल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेनंतर जॉर्जियाचे गव्हर्नर बर्ट जोन्स यांच्या प्रचारसभेत बोलताना ट्रम्प यांनी इराणसोबतचे युद्ध संपल्याचे जाहीर केले. ‘आम्ही इराणसोबतचे युद्ध आज (गुरुवारी) संपुष्टात आणले आहे. आपण कधीही अण्वस्त्र बाळगणार नाही, असे इराणने मान्य केले आहे. त्यासाठीच आपला आग्रह होता. तेच आपले उद्दिष्ट होते’, असे ट्रम्प यावेळी म्हणाले. भांडवली बाजारांना करार आवडेल. त्याचे सकारात्मक चित्र लवकरच दिसेल, असेही ट्रम्प म्हणाले.
करारानंतर होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली होईल, असा दावाही ट्रम्प यांनी केला. ‘हा अतिशय शक्तिशाली आणि सविस्तर असा सामंजस्य करार आहे’, असे सांगत ट्रम्प यांनी इराण अण्वस्त्रनिर्मितीचा कार्यक्रम कायमस्वरूपी थांबवेल, असाही दावा केला. ‘इराण कोणत्याही स्वरूपातील अण्वस्त्र विकसित करणार नाही आणि खरेदीही करणार नाही. इराण अण्वस्त्र बाळगणार नाही’, असे ट्रम्प म्हणाले. अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करारावर जवळपास सहमती झाल्याचे ट्रम्प यांनी गेल्या काही आठवड्यांत अनेकदा म्हटले होते. मात्र, औपचारिकपणे हा करार हुलकावणी देत असल्याने आता करारावर स्वाक्षऱ्या कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वॉशिंग्टन : इराणवरील हल्ले थांबवण्याची घोषणा करताना ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना अंधारात ठेवल्याचे समोर आले आहे. अंतिम वाटाघाटीबाबत माहिती नसल्याने नेतान्याहू हे अमेरिकेच्या अन्य मित्रदेशांच्या नेत्यांकडून माहिती मिळवत असल्याचे सांगण्यात आले. वाढलेले इंधनदर आटोक्यात आणण्याचा दबाव ट्रम्प यांच्यावर आहे, तर इस्रायलमध्ये यंदाच्या निवडणुकीच्या तोंडावर युद्धाच्या उद्दिष्टपूर्तीचा दबाव नेतान्याहू यांच्यावर आहे. त्यामुळे करार झालाच तर इस्रायलची भूमिका काय असेल, याबाबत उत्सुकता आहे.