गदी साध्या, नेहमीच्या गोष्टी, प्रसंग काही वेळा अगदी वेगळ्या, सुंदर रीतीनं मनावर परिणाम करतात आणि मोठा आनंद देऊन जातात. मनात रुजतात. फक्त त्या जशा समोर येतात, तशा स्वीकारायच्या. त्यामागची कारणं शोधत बसायचं नाही, की त्या तशा का होत्या याचा मागोवा घ्यायचा नाही. हा आनंद मी कसा अनुभवला ते सांगते.
माझ्या मुलीचं एक महिन्याचं ट्रेनिंग बेंगळुरू शहरात होतं. अनोळखी शहरात तरुण मुलीला एकटं पाठवायच्या काळजीनं मला ग्रासलं. ट्रेनिंगला तिच्याबरोबर जाणाऱ्या तिच्या मैत्रिणीच्या आईशी मी संपर्क साधला. आम्हा दोघींची काळजी एकच होती. मग आम्ही दोघी आयाही बेंगळुरूसाठी सिद्ध झालो. ट्रेनिंग सेंटरजवळ आमची राहायची सोय झाली. मुली सकाळीच ट्रेनिंगला निघून जायच्या. त्यांचा नाश्ता, जेवण सगळं तिकडंच होतं; त्यामुळे आम्हीही सुट्टी एन्जॉय करायची ठरवलं. शहर बघायचा निर्णय घेतला. मुली गेल्या, की आम्ही आवरून बाहेर पडायचो. शेजारी एक हॉटेल होतं. दक्षिणात्य पदार्थांचा सुगंध दरवळत असे. हॉटेलबाहेर एक गजरेवाली बसलेली असे. मोगरा, अबोली एकत्र बांधलेले गजरे हाताच्या मापानं घ्यायची. बाहेर पडल्यावर तिच्याकडून गजरे घेऊन माळायचे, हॉटेलमधील एखादा पदार्थ खायचा आणि फिल्टर कॉफी घ्यायची असं रुटीन सुरू झालं.
सेल्फ सर्व्हिस असल्यानं काउंटरवर जाऊन कॉफी घ्यावी लागायची. तिथला माणूस कायम हसूनच कॉफीचा ग्लास द्यायचा. नकळत आम्हीही हसून कॉफी घ्यायचो. नंतर समोर असलेल्या बस स्टॉपवरून बस पकडून मुख्य बस स्टँडला जायचो. रोज गेल्यानं तिथले कंट्रोलर ओळखीचे झाले होते. मी माहेरची कन्नड भाषक असल्याचं सांगितल्यानं आणि कन्नड बोलल्यानं आमची चांगली गट्टी जमली. ते मला ‘अक्का’ (मोठी बहीण) म्हणू लागले. आज काय पाहावं आणि कसं जावं हे त्यांनी आधीच ठरवलेलं असायचं. योग्य बसमध्ये बसवणं, ड्रायव्हर-कंडक्टरला ‘माझी अक्का आहे,’ असं सांगून आमचा प्रवास सुरक्षित करणं, ते अगदी मनापासून करायचे. सकाळची गजरेवाली, सुहास्य वदनानं कॉफी देणारा आणि कंट्रोलर यांची आम्हा दोघींना त्या त्या वेळी त्या त्या ठिकाणी असण्याची, बोलण्याची, हसण्याची, मार्गदर्शनाची जणू सवयच होऊन गेली होती.
सकाळी पहिली भेटायची गजरेवाली. तीही आमची वाट पाहत असायची. काळी सावळी, हसऱ्या डोळ्यांची, ठसठशीत कुंकू लावलेली, काठ पदराची साधीच नीटनेटकी नेसलेली साडी, हात भरून बांगड्या, आंबाडा भरून माळलेला अबोली-मोगऱ्याचा गजरा असं तिचं रूप आणि कन्नडमधून साधलेला संवाद यांची आम्हाला भुरळच पडे. त्यानंतर तो कॉफी देणारा हसरा माणूस. विस्कटलेले केस, चेहऱ्यावर पांढऱ्या-काळ्या दाढीचे खुंट, मळके, कळकट कपडे; पण या सगळ्यांत त्याचं ओळखीचं हास्य... आम्हाला दिवसभरासाठी शुभेच्छा देत आहे, असं वाटायचं. तो कधीच काही बोलत नसे. सेंट्रल बस स्टॉपवरील कंट्रोलर हे मध्यमवयीन, नीटनेटके, स्वच्छ कडक युनिफॉर्म, बूट, पदाधिकाऱ्याचा रुबाब, धाक सत्कारणी लावणारे असे होते.
पाहता पाहता २०-२२ दिवस उलटले. मुलींचं ट्रेनिंग संपत आलं होतं. आम्ही परतीच्या तयारीला लागलो. त्या दिवशीही गजरे घेऊन, हॉटेलमध्ये खाऊन कॉफीचं काउंटर गाठलं; पण ‘तो’ दिसला नाही. दुसऱ्या मुलानं कॉफी दिली. कॉफी घेतली खरी; पण काही तरी चुकत होतं, मन उगाचच अस्वस्थ झालं होतं. ठीक आहे... आज रजा असेल, नेमका आमच्याच वेळी बाहेर गेला असेल, असं म्हणून गप्प बसलो. दिवसभर त्याच्या हास्याची कमतरता जाणवत राहिली. पुढं दोन-तीन दिवस तो दिसला नाही. शेवटी परत येण्याच्या आदल्या दिवशी सकाळी आम्ही त्याच्याविषयी चौकशी केली. जे कळलं, त्यावर विश्वास ठेवणं जरा अवघडच गेलं. तो ‘विशेष’ होता, म्हणून हॉटेल मालकानं करुणेपोटी त्याला ते सोपं काम दिलं होतं. ते सर्व जण मिळून त्याची काळजी घेत होते, खाऊ-पिऊ घालीत होते. तो बोलू शकत नव्हता. फक्त हसायचा. दोन-तीन दिवसांपूर्वी कुणाला काही न सांगता कुठं तरी निघून गेला होता. हे आमच्यासाठी धक्कादायक होतं. हा कोण? कुठला? कसा होता? का हसायचा, यापलीकडं जाऊन त्याच्या आश्वासक हास्यानं आम्हाला त्या अनोळखी शहरात दिलेला दिलासा अवर्णनीय होता.
शेवटी परतण्याचा दिवस उजाडला. सकाळी नेहमीप्रमाणे गजरे घेतले. परत जाणार म्हणून वीतभर जास्तीचा गजरा दिला तिनं. गजरे देताना तिचे आणि माझेही हात थरथरले. तिचा पदर आणि माझ्या रुमालानं त्यांचं काम सुरू केलं होतं. खाणं होईपर्यंत आम्ही अश्रू लपवत होतो. फक्त दोन गोड शब्द आणि विचारपूस एवढीच काय ती गजरा घेण्याव्यतिरिक्त झालेली देवाणघेवाण. मोगऱ्याच्या फुलांइतकं सुगंधी नातं. हॉटेलमध्ये नाश्ता केला. सवयीनं मालकानं कॉफीचंही कूपन दिलं. खाऊन झाल्यावर कॉफीच्या काउंटरवर नकळत डोळे त्यालाच शोधत राहिले. तो जिथं कुठं असेल, तिथं सुरक्षित राहू दे, अशी प्रार्थना केली गेली. आज बेंगळुरू दर्शन नसल्यानं बंधुराज कंट्रोलर भेटणार नव्हते. त्या सुंदर शहरातील प्रत्येक प्रेक्षणीय स्थळ आमच्या भावानं अविस्मरणीय करून टाकलं होतं.
आता बराच काळ गेला असला, तरी रक्ताच्या नात्यापलीकडं असलेल्या या अलवार नात्यांला मी नाव देऊ शकले नाही. नुसत्या आठवणीनंही डोळ्यांच्या कडा पाणावतात. या तिघांच्या माणुसकीच्या ओलाव्याचा गारवा आजही आल्हाददायक आहे. ही नाती आहेत तशीच स्वीकारायची असतात आणि मनाच्या कुपीत जपून ठेवायची असतात. आपली बुद्धी, तर्कसंगती यांच्या पलीकडं जाऊन विचार करायचा नसतो. त्यांचं वर्णन शब्दातीत असतं. हीच असते मर्मबंधातली ठेव!











