प्रशासक काळातील अनियमिततेच्या तक्रारींसाठी आमदार प्रशांत बंब यांनी मंगळवारी महापालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांची भेट घेतली. येडगे यांनी तक्रारींबद्दल आवश्यक ती माहिती घेऊन पुन्हा चर्चा करू असे आश्वासन बंब यांना दिले.
बंब यांनी नंतर स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, विरोधी पक्षनेते समीर साजिद यांचीदेखील भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना आयुक्तांच्या भेटीचे कारण स्पष्ट केले.
आमदार बंब म्हणाले, प्रशासककाळात या महापालिकेत मोठी अनियमितता झाली आहे, कोट्यवधींचे व्यवहार करण्यात आले आहेत. याबद्दल यापूर्वीही आपण पत्रव्यवहार केला होता, प्रत्यक्ष भेटून या बद्दलची माहिती विचारली होती. त्यावर काय कारवाई करण्यात आली हे जाणून घेण्यासाठी आयुक्तांची भेट घेतली. या वेळी अधिकारी देखील उपस्थित होते. कोणत्याही मुद्याची माहिती अधिकाऱ्यांना देता आली नाही, त्यामुळे आयुक्तांनी सर्व माहिती घेऊन तुम्हाला चर्चेसाठी बोलावतो असे सांगितले आहे. प्रशासकांच्या विशेषाधिकारात कोणत्याही प्रकारची निविदा न काढता प्रशासकांसह अधिकाऱ्यांचे बंगले सजवण्यात आले, या बद्दल देखील आयुक्तांना माहिती दिली व कारवाईबद्दल प्रश्न विचारला. आयुक्तांनी या बद्दल माहिती घेतो असे सांगितल्याचे बंब म्हणाले.
कचऱ्यावर बायोमायनिंगची प्रक्रिया करण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदेबद्दलही आयुक्तांकडे तक्रार केल्याचे बंब म्हणाले. निविदा भरली एका एजन्सीने, काम करते दुसरीच एजन्सी. त्या एजन्सीकडून कचऱ्यावर प्रक्रिया न करता तो दुसरीकडे टाकण्यात येतो. आयुक्तांनी या बद्दल स्वतंत्र बैठक घेण्याचे मान्य केले असा उल्लेख बंब यांनी केला.
महापौर, सभापती
असताना बंब पालिकेत
प्रशांत बंब भाजपचे आमदार आहेत. महापालिकेत भाजपची सत्ता आहे. महापौर, सभापती भाजपचे आहेत. सभागृह नेतादेखील भाजपचा आहे. असे असताना या पदाधिकाऱ्यांकडे कैफियत न मांडता बंब थेट आयुक्तांना भेटले या बद्दल पालिका वर्तुळात चर्चा सुरू आहे.











