डीएलएड अभ्यासक्रमासाठी प्रवेशाच्या तीन फेरी होणार आहेत. ही प्रवेश प्रक्रिया ३० जूनपर्यंत असणार आहे. ३० जून ते चार जुलै दरम्यान ‘डाएट’ प्राचार्यांना जिल्ह्यातील अध्यापक विद्यालयनिहाय झालेल्या प्रवेशाची खात्री करून घेण्याची मुदत आहेत, तसेच शैक्षणिक वर्षातील डीएलएड अभ्यासक्रमाचे प्रथम वर्ष २३ जूनपासून सुरू होणार आहे. समितीने दिलेल्या सुधारित वेळापत्रकात याबाबत स्पष्ट करण्यात आले.
राज्यातील डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन (डीएलएड्) अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यात २०५७ जागांसाठी सोळाशे विद्यार्थ्यांचे अर्ज आहेत. प्रवेश प्रक्रियेत बुधवारी जाहीर होणाऱ्या गुणवत्ता यादीकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
राज्यात डीएलएड प्रथम वर्ष ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची प्रक्रिया सुरू आहे. २०२६-२७ शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया २७ एप्रिलपासून सुरू आहे. राज्यस्तरीय डीएलएड प्रवेश निवड, निर्णय व प्रवेश संनियंत्रण समितीच्या वतीने प्रक्रिया केली जात आहे. ऑनलाइन अर्ज, आक्षेप निरसननंतर आता पूर्ण भरलेल्या अर्जांची गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर केली जाणार आहे. प्रवेशासाठी तीन फेरी होणार आहे. त्यातील प्रथम फेरी प्रवेशाची यादी ११ जून रोजी जाहीर होणार आहे. पहिल्या फेरीत प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ११ ते १५ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यानंतर १६ जूनपासून दुसऱ्या फेरीची प्रक्रिया सुरू होणार आहे. दुसऱ्या फेरीसाठी विकल्प देण्यासाठी १६ जून अशी मुदत देण्यात आली आहे. यानंतर दुसऱ्या फेरीची यादी १८ जून रोजी तर १८ ते २२ जूनपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीची मुदत असेल. तिसरी प्रवेश फेरी २३ ते ३० जून दरम्यान होणार आहे. व्यवस्थान कोट्यातील प्रवेशाची प्रक्रियाही याच दरम्यान राबविण्यात येत आहे. २ जून ते २३ दरम्यान व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश होणार आहेत.











