वेरूळमध्ये अतिक्रमणांवर हातोडा

महाराष्ट्र टाइम्स

वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिर परिसरात प्रशासनाने अतिक्रमणांवर हातोडा चालवला आहे. अनेक अतिक्रमणधारकांनी स्वतःहून शेड आणि दुकाने हटवली आहेत. सोलापूर-धुळे मार्गावरील वेरूळ लेणी ते घृष्णेश्वर मंदिर रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात येत आहेत. यामुळे भाविक आणि पर्यटकांना होणारा त्रास कमी होणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकास कामांना वेग आला आहे.

वेरूळमध्ये अतिक्रमणांवर हातोडा
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर परिसरातील अतिक्रमण हटवण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. मंगळवारी सकाळपासून अनेक अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमणे हटवली आहेत.

श्री घृष्णेश्वर मंदिराच्या समोरील आणि परिसरातील अतिक्रमणे, त्याचबरोबर सोलापूर-धुळे मार्गावरील वेरूळ लेणी ते घृष्णेश्वर मंदिर रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने मोहीम माहिती घेतली आहे. घृष्णेश्वर मंदिर ते वेरूळ लेणी परिसरातील भाविकांची, पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. कुंभमेळा पार्श्वभूमीवर भाविकांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी श्री घृष्णेश्वर मंदिर विकास आराखड्याअंतर्गत विकास कामांना वेग आला आहे.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वेरूळ येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीच्या कोंडीमुळे पर्यटक भाविकांना त्रास सहन करावा लागत होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने सात दिवसांच्या आत अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्यासंदर्भात अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यामुळे मंगळवारी अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केली आहे. रस्त्यालगत शेड, दुकाने स्वतःहून काढून घ्यावी; अन्यथा अतिक्रमण काढण्याचा खर्च वसूल केला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

वेरूळ ते खुलताबाद शहर मुख्य रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूंना १५.०० मीटरपर्यंतची रस्त्याची हद्द अनिवार्य आहे. परंतु अनेकांनी रस्त्यालगत शेड, इमारती, हॉटेल, दुकाने थाटून अतिक्रमण केली आहेत. परिणामी या ठिकाणी वारंवार कोंडी होत होती. आता रस्त्यावरील अतिक्रमण हटविल्यामुळे वाहतुकीच्या कोंडीचा त्रास भाविकांना सहन करावा लागणार नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली असून, वेरूळ लेणी ते घृष्णेश्वर मंदिर परिसर अतिक्रमणमुक्त होत असल्याचे दिसत आहे.