‘नुकसानीचे पंचनामे तातडीने करा’

महाराष्ट्र टाइम्स

राज्यात मे आणि जून महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. जळगाव, बुलडाणा, सोलापूर, पुणे, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक फळपिकांचे नुकसान झाले आहे. भारतीय कृषी विमा कंपनीकडून सर्वेक्षण सुरू असून, पुढील दहा दिवसांत सर्व पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

complete damage assessment for fruit crops affected by unseasonal rains in the state for farmers compensation

राज्यात मे आणि जूनमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस , वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत आणि शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची प्रक्रिया गतिमान करावी, असे निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी दिले. वादळी वाऱ्यामुळे झालेल्या फळपीक नुकसानीसंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत भरणे बोलत होते.

या बैठकीला पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, मे आणि जून २०२६ या कालावधीत राज्यातील २७ जिल्ह्यांमध्ये एकूण ६१ हजार ४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, त्यापैकी १८ हजार १२१ हेक्टर क्षेत्र केळी पिकाखालील आहे. बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण आणि पंचनाम्याची प्रक्रिया क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे. विशेषतः ६ जून रोजी झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, त्याचे अचूक मूल्यमापन करणे आवश्यक आहे.’

जिल्हानिहाय आढाव्यात जळगाव, बुलडाणा, सोलापूर, पुणे, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फळपिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. जळगाव जिल्ह्यात मे आणि जून महिन्यात मिळून ७ हजार ५९४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, त्यापैकी ७ हजार २१६ हेक्टर क्षेत्र केळी पिकाखालील आहे. जिल्हा प्रशासन, कृषी विभाग आणि महसूल विभागामार्फत पंचनामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले. भारतीय कृषी विमा कंपनीकडून नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण सुरू असून सर्व पंचनामे पुढील दहा दिवसांत पूर्ण करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.