महाराष्ट्राला दिलेल्या पाठबळाबद्दल कृतज्ञता

महाराष्ट्र टाइम्स

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १२ वर्षांच्या कार्यकाळाबद्दल शुभेच्छा दिल्या. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्राने दिलेल्या पाठबळाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सिंचन प्रकल्प, शेतकरी कल्याण, वारसा स्थळांचे जतन आणि पायाभूत सुविधांच्या विकासातील पंतप्रधानांच्या भूमिकेचे कौतुक केले. 'विकास, विश्वास आणि जनसहभाग' या मंत्रावर देशाने प्रगती केल्याचे नमूद केले.

support for maharashtra during prime minister modis tenure

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पत्र लिहून शुभेच्छा दिल्या आहेत. ‘विकास, विश्वास आणि जनसहभाग’ या मंत्रावर देशाने गेल्या बारा वर्षांत मोठी झेप घेतली असून, ‘समर्थ भारत ते विकसित भारत’ हा आत्मविश्वासाचा संकल्प साकार होत असल्याचे फडणवीस यांनी पत्रात नमूद केले आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्राने दिलेल्या सहकार्याचा या पत्रात विशेष उल्लेख करण्यात आला आहे.

राज्यातील सिंचन प्रश्न सोडविण्यासाठी २०१५ मध्ये मागितलेल्या विशेष पॅकेजला तत्काळ मंजुरी देण्यात आली. त्यातून १०० हून अधिक प्रकल्प पूर्ण झाल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत पंतप्रधान संवेदनशील राहिल्याचेही त्यांनी नमूद केले. या पत्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याच्या प्रयत्नांपासून मराठी भाषेला अभिजात दर्जा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील स्मारकाचा विकास, इंदूमिल स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देणे अशा निर्णयांचा उल्लेख करत फडणवीस यांनी ‘विकास आणि विरासत’ या धोरणाचा गौरव केला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ , मेट्रो-३, समृद्धी महामार्ग, अटल सेतू, कोस्टल रोड आणि ‘कनेक्टिंग लिंक’ यांसारखे प्रकल्प जनतेच्या सेवेत आणण्यात पंतप्रधानांची भूमिका महत्त्वाची ठरल्याचे त्यांनी अधोरेखित केले.