मुंबईतून कोकणात गावी सुट्टीत नातेवाईकांकडे आलेल्या तीन सख्ख्या भावंडांचा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदीत पोहताना मृत्यू झाला. बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. आकाश रामा कांबळे (२३), नरेश रामा कांबळे (२२) आणि कैलास रामा कांबळे (१७) अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघे चेंबूर येथील मुकुंदनगरचे रहिवासी असून खेड शहरातील एकविरानगर येथे नातेवाईकांकडे आले होते.
बुधवारी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास महाड नाक्याजवळील जगबुडी नदीपात्रात पोहण्यासाठी गेले. नदीतील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. तिघांपैकी एक जण खोल पाण्यात जाऊन बुडू लागला. आपल्या भावाला मृत्यूच्या दाढेतून वाचवण्यासाठी उरलेले दोघेही त्याच्या मदतीला धावले. यावेळी या दोघांचाही मृत्यू झाला.

