‘मेडिसिटी’द्वारे आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार

महाराष्ट्र टाइम्स

नवी मुंबईत जागतिक दर्जाची मेडिसिटी उभारली जाणार आहे. महाराष्ट्र सरकार, क्लीव्हलँड क्लिनिक आणि इतर संस्थांनी यासाठी सामंजस्य करार केला आहे. या मेडिसिटीमध्ये रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेष यांचा समावेश असेल. यामुळे आरोग्य सेवा क्षेत्रात मोठे बदल अपेक्षित आहेत. सुमारे १.२ अब्ज डॉलरची गुंतवणूक आणि १० हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

medicity a unified hub for healthcare services

‘‘मेडिसिटी’ ही रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण , संशोधन, नवोन्मेष आणि प्रतिभेला एका एकात्मिक केंद्रात एकत्र आणणारी जागतिक दर्जाची आरोग्य सेवा परिसंस्था उभारण्याची राज्य सरकारची संकल्पना आहे. ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘हील इन इंडिया’ या दृष्टिकोनाशी सुसंगत असून लवकरच ती प्रत्यक्षात येईल’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्र सरकार, क्लीव्हलँड क्लिनिक (सीसी), ब्रुकफिल्ड अॅसेट मॅनेजमेंट आणि आरोधन हेल्थ सिटी (एएचसी) यांनी नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटीच्या विकासासाठी सहकार्य करण्याबाबत बुधवारी सामंजस्य करार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे यावेळी सहभागी झाले होते. ‘आज झालेल्या सामंजस्य करारातून ही भागीदारी भारतातील आरोग्य सेवांच्या क्षेत्रातील परिवर्तनकारी प्रवासाची सुरुवात आहे. जगातील सर्वात प्रतिष्ठित आरोग्य संस्थांपैकी एक असलेल्या क्लीव्हलँड क्लिनिकने महाराष्ट्रासोबत या उपक्रमात भागीदारी करण्याचा निर्णय घेतल्याचा आम्हाला अभिमान आहे’, असे ते म्हणाले.

भारताचे पहिले जागतिक स्तरावरील आरोग्य सेवा, संशोधन, वैद्यकीय शिक्षण आणि वैद्यकीय पर्यटन केंद्र म्हणून संकल्पित करण्यात आलेली नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी ही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगत सुमारे २५० एकर क्षेत्रावर विकसित केली जाणार आहे. प्रस्तावित भागीदारीनुसार, क्लीव्हलँड क्लिनिक या प्रकल्पाची प्रमुख संस्था म्हणून कार्य करेल. अत्युच्च दर्जाची आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि रुग्णकेंद्रित आरोग्य सेवा पुरविण्यातील जागतिक अनुभव या प्रकल्पासाठी उपलब्ध करून दिला जाईल. या प्रकल्पातून सुमारे १.२ अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक आकर्षित होण्याची आणि १० हजारांहून अधिक थेट रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

एनएमआयएमसीची संकल्पना केवळ आरोग्य सेवा पुरविण्यापुरती मर्यादित नाही. या परिसंस्थेमध्ये जागतिक दर्जाची रुग्णालये, वैद्यकीय आणि परिचारिका शिक्षण संस्था, क्लिनिकल संशोधन केंद्रे, जैवतंत्रज्ञान आणि जीवन विज्ञान सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित आरोग्य सेवा नवोन्मेष, वेलनेस पायाभूत सुविधा आणि संबंधित आरोग्य सेवा एकाच सहयोगी कॅम्पसमध्ये विकसित करण्यात येणार आहेत.