जामिनावर असताना त्याविषयीच्या अटींचा भंग करत मुंबई प्रेस क्लबमध्ये कार्यक्रमाला उपस्थित राहून माओवादी विचारसरणीचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करत राष्ट्रीय तपास संस्थेने एल्गार परिषद व माओवाद्यांशी संबंध प्रकरणातील आणखी दोन आरोपी ंविरोधात न्यायालयात अर्ज केला आहे. आरोपी वर्नन गोन्साल्विस व अरुण फरेरा यांचा जामीन रद्द करावा, अशी विनंती एनआयएने आपल्या नव्या अर्जात केली आहे.
‘न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर करताना अनेक अटी घातल्या. त्यात न्यायालयाच्या परवानगीविना मुंबईबाहेर जायचे नाही, पासपोर्ट एनआयएकडे जमा करायचा, अशा अटींसह या प्रकरणाबाबत माध्यमांशी बोलायचे नाही, या अटीचाही समावेश होता. असे असताना या आरोपींनी १९ जानेवारी रोजी मुंबई प्रेस क्लबमध्ये एका कार्यक्रमात सहभाग घेतला आणि माओवादी विचारसरणीचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला’, असा आरोप एनआयएने केला आहे.

