‘चणा भंडार’मधील पदार्थ जप्त

Contributed byम.टा. विशेष प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुलुंड पश्चिम येथील गुप्ता चणा भंडारमध्ये अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकली. दुकानात अस्वच्छता आणि विनालेबल अन्नपदार्थ आढळले. आरोग्याला घातक असलेला ११४.२ किलो अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. नियमांचे उल्लंघन केल्याने दुकान बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी ही कारवाई करण्यात आली.

contaminated and unlabeled food items seized at gupta chana bhandar in mulund

मुलुंड येथील ‘गुप्ता चणा भंडार’ येथे अस्वच्छता आणि विनालेबल अन्नपदार्थ आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ११४.२ किलो अन्नपदार्थांचा ८,२९० रुपये किंमतीचा साठा जप्त केला.

मुलुंड पश्चिम येथील गौतमनगर येथे डम्पिंग रोड परिसरामध्ये असलेल्या या दुकानाची ‘एफडीए’ने तपासणी केली. त्यावेळी तिथे आरोग्याला घातक असलेल्या अन्नपदार्थांची साठवणूक करण्यात आल्याचे दिसून आले. या दुकानामध्ये उत्पादित तसेच विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या विविध अन्नपदार्थांच्या पाकिटांवर उत्पादक, निर्मिती तसेच मुदत संपल्याच्या कालावधीचा कोणतेही अधिकृत तसेच कायदेशीर लेबल त्यावर लावण्यात आलेले नव्हते. सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या गंभीर बाबींची तत्काळ दखल घेत अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी सुमारे ११४.२ किलोंचा अन्नपदार्थांचा साठा जप्त केला आहे. या दुकानामध्ये पदार्थ साठवणूक करण्यातील अस्वच्छता, किटक प्रादुर्भाव या नियमांचे सर्रास उल्लंघन केल्याने दुकान बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.