‘मोदींची नेहरूंशी तुलना अशक्य’

महाराष्ट्र टाइम्स

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी तुलना करणे अशक्य असल्याचे म्हटले आहे. देशात अनेक समस्या असून सत्ताधाऱ्यांची आस्था यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी विरोधकांवर टीका केली. खासदार अमोल कोल्हे यांच्या मालिकेच्या संदर्भात रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी आर्थिक मदतीची घोषणा केली.

‘मोदींची नेहरूंशी तुलना अशक्य’
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

‘पंडित जवाहरलाल नेहरू ंच्या कर्तृत्वाची, त्यांच्या देशाच्या इतिहासातील त्यागाची बरोबरी इतर कोणाशीही होऊ शकत नाही. त्यामुळे नेहरू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणे पूर्णपणे अशक्य आहे. देशात मोदींसारखा नेता झाला नाही, असे सांगण्याचा प्रयत्न काही लोक सतत करत आहेत. पण नेहरू हे नेहरूच होते’, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या समर्थकांवर बुधवारी टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचा २७वा वर्धापनदिन सोहळा बुधवारी नरीमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण केंद्रात आयोजित करण्यात आला होता. यावेळी शरद पवार यांनी सत्ताधारी भाजप, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका केली. ‘राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाची जाहिरात वृत्तपत्रांत पहिल्या पानावर झळकली आहे. पहिल्या पानावरील जाहिरातींची किंमत किती असते, हे सर्वांना माहित आहे. म्हणूनच आपण कधी त्या रस्त्याने गेलो नाही. मात्र, आजच्या कार्यक्रमाला असलेली मोठी उपस्थिती पाहिली तर ही जाहिरात आपल्या सर्वांसाठी आहे, याचे आपण स्वागत केले पाहिजे’, या शब्दांत त्यांनी राष्ट्रवादीवर टीका केली.

‘देशात अनेक समस्या आहेत. बेरोजगारी, आदिवासी, महिला, अल्पसंख्याक या घटकांच्या समस्या वाढत आहेत. ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना या प्रश्नांविषयी किती आस्था आहे, यावर भाष्य न केलेलेच बरे. काही लोक सातत्याने देशात नरेंद्र मोदी यांच्यासारखा नेता झालाच नाही, असे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. मोदींना नेहरूंपेक्षा अधिक पंतप्रधानपदाचा कार्यकाळ मिळाला, चांगली गोष्ट आहे. पण, त्यांची तुलना नेहरूंशी कशी होऊ शकते, अशा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला.

पक्ष सोडल्यामुळे राष्ट्रवादी कमकुवत झालेली नसून निष्ठावंत कार्यकर्ता शरद पवार यांच्यासोबत असल्याची ग्वाही यावेळी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली. खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ मालिका बंद पडत असल्याचे सांगितले. परंतु, ही गोष्ट बंद पडू देणार नाही, १४ जूननंतर वेगळ्या माध्यमात ती सुरूच राहील, याची ग्वाही दिली. त्यास प्रतिसाद देत आमदार रोहित पवार यांनी त्यांना ५० लाख रुपयांची तर जितेंद्र आव्हाड यांच्याकडून १० लाख रुपयांची मदत जाहीर केली.