केरळात शिगेलाचे ११ रुग्ण; ५७८ जणांमध्ये लक्षणे

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

केरळात शिगेलाचा संसर्ग वाढत आहे. तिरुवनंतपुरम, कोल्लम आणि कोझिकोड जिल्ह्यात रुग्ण आढळले आहेत. वायनाडमध्येही रुग्ण आहेत. ५७८ जणांमध्ये लक्षणे दिसत आहेत. अतिसार, ताप आणि पोटात पेटके ही लक्षणे आहेत. दरम्यान, पणजी येथे खून प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली. चंदीगडमध्ये जिम मालकाची हत्या झाली. जम्मू-श्रीनगर महामार्ग रात्री बंद राहणार आहे.

11 patients with shigella in kerala and symptoms in 578 people

तिरुवनंतपुरम : केरळमधील तिरुवनंतपुरममध्ये सहा, कोल्लममध्ये दोन आणि कोझिकोड जिल्ह्यात तीन जणांना शिगेलाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री के मुरलीधरन यांनी गुरुवारी दिली. याआधी वायनाडमध्ये नऊ रुग्ण आढळले होते. सध्या ५७८ जणांमध्ये या संसर्गाची लक्षणे असल्याचे ते म्हणाले. शिगेला हा जिवाणूजन्य संसर्ग प्रामुख्याने दूषित अन्न-पाण्याद्वारे आणि बाधितांच्या संपर्कातून पसरतो. अतिसार, ताप आणि पोटात पेटके ही या आजाराची लक्षणे आहेत.

आरोपीला पकडले

पणजी : मंगळुरू येथील पणंबूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खून प्रकरणातील आरोपी हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसने पळून जात असताना गोवा रेल्वे पोलिसांनी त्याला अटक केली. मडगाव रेल्वे स्थानक आणि आसपासच्या परिसरात पोलिसांनी कर्मचारी तैनात केले होते. ‘सीसीटीव्ही’ फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे रेल्वे स्थानकावर गाडी आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

जिम मालकाची हत्या

चंडीगड : हरियाणातील हांसी येथे दोन अज्ञात हल्लेखोरांनी एका जिम मालकाचा गोळ्या झाडून खून केला. ही घटना गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास फवारा चौकाजवळ घडली. कपिल (वय २६) असे खून झालेल्याचे नाव आहे. हल्लेखोर दुचाकीवरून आले होते. या घटनेचे ‘सीसीटीव्ही’ फुटेज उपलब्ध झाले असून, पोलिस त्या आधारे तपास करीत आहेत.

महामार्ग रात्री बंद

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात विविध ठिकाणी दुरुस्तीची आणि डांबरीकरणाची कामे करण्यासाठी, १२ जूनपासून काही ठरावीक दिवशी जम्मू-श्रीनगर महामार्गावरील रात्रीची वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.