नवी दिल्ली : आपल्या राजकीय कारकिर्दीतील आव्हानात्मक काळात ममता बॅनर्जी यांनी साथ दिली होती. त्यामुळे आजच्या कठीण काळात आपण त्यांची साथ सोडणार नाही, असे ज्येष्ठ अभिनेते आणि तृणमूलचे पश्चिम बंगालमधील आसनसोल येथील खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी गुरुवारी स्पष्ट केले. ‘काही लोक कदाचित अपरिहार्यता, भीती किंवा प्रलोभनांमुळे ममता यांना सोडून गेले असतील; परंतु मी पक्ष किंवा पक्षनेत्याची साथ कधीही सोडणार नाही’, असे त्यांनी नमूद केले.
तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार कल्याण बॅनर्जी यांनी पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना, त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी किंवा त्यांच्यासारख्या जुना-जाणता नेता, यापैकी एकाची निवड करण्याचा ‘अल्टिमेटम’ गुरुवारी दिला. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस असलेले अभिषेक अतिशय अहंकारी आणि चंचल मानसिकतेचे असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
‘अभिषेक यांना सर्व प्रमुख पदांवरून हटवून फक्त सामान्य कार्यकर्ता म्हणून ठेवले, तरच मी पक्षात राहीन. जे ज्येष्ठांशी गैरवर्तन करतात आणि ज्यांची मनोवृत्ती बॉससारखी आहे, असे अभिषेक माझे नेते होऊ शकत नाहीत. ते नेते राहिले, तर माझ्यासाठी तृणमूलमध्ये राहणे अशक्य आहे. त्यामुळे आपल्या रक्ताच्या नात्याला कायम ठेवायचे की, पक्षासाठी आपल्या आयुष्यातील ४० वर्षे खर्ची घातलेल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना, याचा अंतिम निर्णय दीदी (ममता बॅनर्जी) यांनी घ्यायला हवा’, असा निर्वाणीचा इशारा श्रीरामपूरचे लोकसभा खासदार असलेल्या कल्याण बॅनर्जी यांनी दिला. अभिषेक यांच्याशी संबंधित सर्व कायदेशीर बाबी आणि न्यायालयीन याचिकांपासून स्वतःला बाजूला ठेवण्याची घोषणाही त्यांनी केली. त्याचवेळी, ‘तृणमूल काँग्रेसशी संबंधित खटले मात्र आपण लढवत राहू’, असे त्यांनी स्पष्ट केले.
आमदारांच्या बनावट स्वाक्षरी प्रकरणात सीआयडीने दाखल केलेल्या खटल्यात कल्याण बॅनर्जी कोलकाता उच्च न्यायालयात अभिषेक यांच्या वतीने बाजू मांडत होते. परंतु, ममता बॅनर्जी यांचे कालीघाट येथील निवासस्थान व पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय, तसेच अभिषेक यांचे कॅमॅक स्ट्रीटवरील कार्यालय येथे तपास यंत्रणेने केलेल्या छापेसत्रांबाबत अभिषेक यांनी एक स्वतंत्र रिट याचिका दाखल केल्याचे समजल्यानंतर या दोन नेत्यांमधील मतभेद टिपेला पोहोचले.
‘ही दोन्ही प्रकरणे एकमेकांशी संबंधित असून, बनावट स्वाक्षरी प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या खंडपीठासमोर मी तपास मोहिमेचा मुद्दा मांडला होता. न्यायाधीशांनी सुनावणीसाठी गुरुवारची तारीख निश्चित केली होती. त्यानंतर, अभिषेक यांचे काही प्रतिनिधी मला भेटायला आले आणि सीआयडीच्या छाप्यांच्या मुद्द्यावर स्वतंत्र रिट याचिका दाखल केल्याचे सांगितले. याची काहीच कल्पना नसल्यामुळे मला आश्चर्य वाटले’, असे कल्याण यांनी पत्रकारांना सांगितले.
‘मला विश्वासात का घेतले गेले नाही, असे विचारले असता, वरून आलेल्या आदेशानुसार तसे करण्यात आल्याचे सांगण्यात आले’, असा आरोप त्यांनी केला. ‘मला याची कल्पना असती, तर मी हे प्रकरण न्यायाधीशांसमोर मांडले नसते. कारण दोन वेगवेगळी खंडपीठे एकच प्रकरण ऐकू शकत नाहीत. अभिषेक यांचे अनेक सल्लागार आहेत. त्यामुळे मी पक्षाला सांगितले आहे की, भविष्यात कोणत्याही न्यायालयीन खटल्यात मी त्यांचे प्रतिनिधित्व करणार नाही. अशा घमेंडखोरी आणि अस्थिर मानसिकतेला तोंड देणे अशक्य आहे’, असे कल्याण म्हणाले. अभिषेक यांनी आपल्या ४५ वर्षांच्या व्यावसायिक अनुभवाचा सन्मान केला नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.









