श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी (छत्रपती संभाजीनगर) येथे आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वी समारोप झाला. औषध विकास, जैवउपलब्धता , गुणवत्ता नियंत्रण आणि आधुनिक संशोधन तंत्रज्ञान या विषयांवरील ज्ञानविनिमयासाठी ही परिषद महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरली.
उद्घाटक डॉ. उमेश व्ही. बनाकर, प्रा. रजनीश कामत, डॉ. आनंद कुलकर्णी, प्रा. व्ही. के. मोरया, डॉ. एस. एस. तोष्णीवाल, डॉ. बी. के. साखळे आणि डॉ. व्ही. व्ही. पांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सचिव एकनाथ जाधव, सहसचिव अमन जाधव तसेच प्रशासकीय अधिकारी भागचंद जाधव यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी संशोधनाधिष्ठित शिक्षण आणि नवोपक्रमक्षम विचारसरणी ही देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
दोन दिवस चाललेल्या या परिषदेत विविध तांत्रिक सत्रे, संशोधन निबंध व पोस्टर सादरीकरणे तसेच तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली. देशभरातील संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी आणि फार्मास्युटिकल क्षेत्रातील व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. परिषदेत ३३६ हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
अध्यक्षस्थानी श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. संतोष शेळके होते. समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रवीण के. वक्ते, प्र-कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर उपस्थित होते. त्यांनी संशोधन, नवोपक्रम आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांनी जागतिक संधींचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन केले. सूत्रसंचालन पूनम साबळे व रश्मी चौथे यांनी केले.










