कृषी सेवा केंद्रांवर शुकशुकाट

महाराष्ट्र टाइम्स

मृग नक्षत्राचा काळ सुरू झाला तरी समाधानकारक पाऊस पडलेला नाही. यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी चिंतेत आहेत. खरीप हंगामासाठी आवश्यक मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, पेरणीसाठी पुरेसा पाऊस नसल्याने शेतात आणि बाजारपेठेतही शांतता आहे. कृषी सेवा केंद्रे आणि खत-बियाणे विक्रीची दुकाने ओस पडली आहेत. हवामान विभागाने आगामी काळात पावसाची शक्यता वर्तवली आहे. शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत.

कृषी सेवा केंद्रांवर शुकशुकाट
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

मृग नक्षत्र सुरू होऊनही समाधानकारक पाऊस न झाल्याने ग्रामीण भागांतील शेतकरी चिंतेच्या छायेत आहेत. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी मशागतीची बहुतांश कामे पूर्ण केली असली, तरी पेरणीयोग्य पावसाअभावी शेतात आणि बाजारपेठेतही ग्राहकांच्या प्रतीक्षेचे वातावरण आहे. तालुक्यातील गाव व परिसरातील कृषी सेवा केंद्रे तसेच खते-बियाणे विक्रीच्या दुकानांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

यंदा पावसाने दडी मारल्याने बी-बियाणे, खते व औषधांच्या खरेदीवर ब्रेक लागला आहे. दमट व ढगाळ वातावरणामुळे पावसाच्या आशा निर्माण होत असल्या तरी प्रत्यक्षात पाऊस होत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. वेळेवर पाऊस न झाल्यास खरीप हंगामाचे नियोजन विस्कळित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मागील वर्षी मृग नक्षत्राच्या सुरुवाती पूर्वीच जोरदार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे बी-बियाण्यांच्या खरेदीसाठी दुकानांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. या काळात खते-बियाण्यांच्या खरेदीसाठी नेहमीच मोठी वर्दळ असते. मात्र यंदा ग्राहकांची संख्या अत्यल्प असून विक्रीवर परिणाम झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, राज्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना पेरणीची घाई करू नये, असा सल्ला दिला आहे. हवामान विभागाने आगामी काही दिवसांत पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविली असून, शेतकऱ्यांच्या नजरा पावसाच्या प्रतीक्षेत आभाळाकडे खिळल्या आहेत.