जिल्हाधिकाऱ्यांनी साधला शेतकऱ्याशी संवाद

महाराष्ट्र टाइम्स

वेरूळ येथे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी शेतकरी ताराचंद जोनवाल यांच्या शेताला भेट दिली. त्यांनी फळबाग लागवड, दुष्काळात बागा वाचवण्याबाबत मार्गदर्शन केले. खरीप हंगामाची तयारी, बियाणे, खते, पीक कर्ज आणि शेत रस्त्यांसारख्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रशासनाच्या मदतीचा दिलासा दिला. हा उपक्रम शेतकऱ्यांशी सुसंवाद साधण्यासाठी होता.

जिल्हाधिकाऱ्यांनी साधला शेतकऱ्याशी संवाद
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

वेरूळ येथील शेतकरी ताराचंद बालचंद जोनवाल हे सकाळी साडेसहाच्या सुमारास शेतामध्ये काम करत असताना त्यांच्या शेतात जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनांचा ताफा आला. जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. कारमधून खाली उतरले. त्यांनी शेतकरी ताराचंद जोनवाल यांची विचारपूस केली; तसेच पेरू फळबाग लागवड व ड्रॅगन फ्रुट फळबाग लागवडीबाबत माहिती घेऊन शेतीची पाहणी केली. टंचाईग्रस्त परिस्थितीत फळबागा कशा वाचवायच्या, याबद्दल मार्गदर्शन आणि चर्चा केली. खरीप हंगामाच्या तयारीविषयी त्यांनी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि प्रशासन तुमच्या सोबत आहे, असा धीरही दिला.

स्वतः जिल्हाधिकारी शेतांच्या बांधावर पोहोचल्याने शेतकरी अधिकारी सुसंवाद होतांना दिसला. जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर हा अनोखा उपक्रम वेरूळ येथे राबविण्यात आला आहे.

या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम., अप्पर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे निवासी जिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार संतोष गुट्टे, ज्ञानेश्वर तारगे, हणमंत बोयनर, प्रतिभा कांबळे, सुभाष पांढरे, प्रमोद सावंत, अविनाश निळेकर, अनिल भगत, किशोर पाडळे, संजय ढबाले, भूषण रोजेकर, गंगाधर गायकवाड, विजय सोनवणे, राजेश इंगळे, सोमनाथ इंगळे, मधुकर इंगळे, ज्ञानेश्वर वाघ, धनराज जोनवाल, साहेबसिंग जोनवाल, राजू जंगले, साहेबराव सारंगे, गणेश शिंदेउपस्थित होते.

शेतकऱ्यांचे खरीप हंगामाच्या दृष्टीने शंका समाधान, बी-बियाणे, खते, पीक कर्ज प्रक्रिया, शेत रस्ता आदी विषयांवर शंका समाधान करण्यासाठी जिल्हाधिकारी बांधावर गेले. जिल्हाधिकारी गौडा स्वतः ताराचंद जोनवाल यांच्या शेतात आल्याने जोनवाल यांनी आनंद व्यक्त केला; तसेच त्यांच्या समस्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडल्या. शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या शेत रस्ता इतर सुविधा मालकी हक्क, फेरफार, खते, बियाण्याची उपलब्धता याविषयी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.