वाहतूककोंडीचा थेट परिणाम इंधन कार्यक्षमतेवरही होत आहे. दीर्घकाळ एकाच जागी सुरू असलेली वाहने अधिक इंधन खर्च करतात. लडाखसारख्या दुर्गम भागात पंप मर्यादीत संख्येत, तसेच परस्परांपासून अधिक अंतरावर असल्याने ही बाब अधिक चिंताजनक ठरते. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या पर्यटकांनी वाहनांची योग्य तयारी करूनच प्रवास करावा, असे आवाहन स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
लडाखमधील सर्वाधिक निसर्गरम्य स्थळांकडे जाणाऱ्या नुब्रा–पँगोंग मार्गावरील वाढती वाहतूककोंडी पर्यटकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. अलीकडेच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये या मार्गावरील अरुंद रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा संथगतीने सरकत असल्याचे दिसून आले. या मार्गावर वाहतूककोंडीची समस्या आता नित्याची झाल्याने पर्यटकांना अनेक ठिकाणी तासन्तास अडकून राहावे लागत आहे.
नुब्रा–पँगोंग मार्ग हा निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध असला, तरी वाहनचालकांसाठी तो तितकाच आव्हानात्मक मानला जातो. गेल्या काही वर्षांत या मार्गावरील पर्यटकांच्या वाहनसंख्येत मोठी वाढ झाली आहे. विशेषतः सुट्ट्यांच्या काळात येथे अनेकदा मोठ्या प्रमाणात कोंडी निर्माण होते. रस्त्यावरील अनेक अरुंद भागांमध्ये ओव्हरटेक करणे अशक्य असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. परिणामी, निसर्गरम्य प्रवासाचा आनंद घेण्याऐवजी पर्यटकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे.









