खत खरेदीवरून शेतकरी आक्रमक

महाराष्ट्र टाइम्स

खरीप हंगाम जवळ आला आहे पण शेतकऱ्यांना खत मिळत नाहीये. कृषी विभागाचे ॲप बंद पडल्याने शेतकरी त्रस्त आहेत. सिल्लोडमध्ये शेतकऱ्यांनी खताची पोती अंगात घालून आंदोलन केले. त्यांनी खत उपलब्ध करून देण्याची, ॲप सुरू करण्याची आणि कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने यावर तातडीने लक्ष द्यावे.

खत खरेदीवरून शेतकरी आक्रमक
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

खरीप हंगाम तोंडावर आला असताना तालुक्यात शेतकऱ्यांना खत मिळत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यातच कृषी विभागाचे खत वितरणाचे ॲप आहेतही ही वारंवार बंद पडत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने तालुका कृषी अधिकारी कार्यालय, सिल्लोड येथे अनोखे आंदोलन करण्यात आले.

या वेळी आंदोलनकर्त्यांनी अंगात खताची पोती घालून; तसेच हातात खत घेण्यासाठी टोपल्या घेऊन ‘खत द्या, खत द्या,’ अशा जोरदार घोषणा दिल्या.

तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप यांना निवेदन देऊन तालुक्यात तत्काळ पुरेशा प्रमाणात खत उपलब्ध करून द्यावे, बंद पडलेले ॲप सुरू करावे, ॲप सुरू होईपर्यंत ऑफलाइन पद्धतीने खत वाटप करावे; तसेच खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

या वेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रसाद वराडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील शिंदे, राजू वराडे, सागर साखळे, गजानन साखळे, विनोद लहाने, आदी उपस्थित होते.