वाळूज महानगर : शेतीसाठी लागणारी खते ऑनलाइन नोंदणी प्रणाली व्यवस्थित चालत नसल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो त्यामुळे ऑफलाइन खतविक्री करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या प्रकरणी गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक दीपक गवळी यांची भेट घेऊन दोन दिवसांत निर्णय झाला नाही तर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तीव्र आंदोलन व रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.
खतखरेदीसाठीच्या ऑनलाइन प्रणालीबाबत शेतकऱ्यांमध्ये पुरेशी जनजागृती करण्यात आली नसल्याने नोंदणी करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे ऐन पेरणीच्या तोंडावर खते मिळण्यात विलंब होत आहे. त्यामुळे ऑनलाइनसह ऑफलाइन खतविक्री व्यवस्था कायम ठेवण्यात यावी, अशी मागणी जिल्हा कृषी अधीक्षक यांना तालुक्यातील शेतकरी, विविध शेतकरी संघटना व शेतकरी कृती समिती यांच्या वतीने करण्यात आली. मंगेश साबळे, राहुल ढोले, महेश गुजर, अण्णासाहेब जाधव आदींची उपस्थिती होती.










