पोखरीतील उपोषण अखेर मागे

महाराष्ट्र टाइम्स

पोखरी येथे तीन दिवसांपासून सुरू असलेले उपोषण अखेर मागे घेण्यात आले. प्रशासनाने सकारात्मक आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी उपोषण सोडले. एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली होती. बहुजन वंचित आघाडी आणि समाजबांधवांनी हे उपोषण केले होते. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली.

पोखरीतील उपोषण अखेर मागे
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

पोखरी (ता. वैजापूर) येथे घडलेल्या एका प्रकरणात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेले उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर चौथ्या दिवशी गुरुवारी (११ जून) मागे घेण्यात आले. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाजबांधवांनी आरोप करून निषेध व्यक्त केला होता. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी बहुजन वंचित आघाडी तसेच समाज बांधवांच्या वतीने आठ जूनपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते.

उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे, तहसीलदार सुनील सावंत, सपोनि वैभव रणखांब, नायब तहसीलदार महाजन, गटविकास अधिकारी अक्षय भालेराव, मंडळ अधिकारी नामदेव कुसनुरे, तलाठी आर. के. पवार, ग्रामसेवक हृषिकेश गायकवाड, सामाजीक न्याय विभागाचे डिंगबर मोरे तसेच पोलिस पाटील विठ्ठल ठुबे यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. सलग चार दिवस सुरू असलेल्या आंदोलनानंतर प्रशासनाकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्याने गुरुवारी उपोषण मागे घेण्यात आले. या आंदोलनात बहुजन वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष सखाराम शिनगारे, भीमराव महाले, अप्पासाहेब गायकवाड, सिद्धार्थ महाले यांच्यासह समाजबांधव सहभागी झाले होते.