राज्यातील नर्सिंग शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बीएस्सी नर्सिंग आणि जनरल नर्सिंग अँड मिडवाइफरी (जीएनएम) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतलेल्या नर्सिंग सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यंदा चार विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाइल गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले आहे.
मे महिन्यात झालेल्या या परीक्षेसाठी एकूण ४७ हजार ७२२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४३ हजार २८३ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यामुळे परीक्षेची उपस्थिती ९०.७० टक्के इतकी नोंदवली गेली. निकाल विद्यार्थ्यांच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आला असून, आता लवकरच केंद्रीय प्रवेश प्रक्रिया (कॅप) सुरू होणार आहे.
यंदाच्या परीक्षेत १०० पर्सेंटाइल मिळवणारे चारही विद्यार्थी महाराष्ट्रातीलच आहेत. ठाण्याची सरिता विलास घोलप, नागपूरची ख्रिस्टीना आशिष जाकोब, बीडचा शिवराज लक्ष्मण शेळके आणि ठाण्याची सियोना शाजी वल्लूपारा यांनी ही कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे अव्वल ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तीन विद्यार्थिनी आणि एका विद्यार्थ्याचा समावेश आहे.
नर्सिंग सीईटी परीक्षा ६ आणि ७ मे रोजी तीन सत्रांत संगणकाधारित पद्धतीने घेण्यात आली होती. राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील ११६ परीक्षा केंद्रांवर परीक्षा पार पडली. यंदा महाराष्ट्राबाहेरील कोणत्याही केंद्रावर परीक्षा घेण्यात आली नव्हती. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ११ हजार २८ विद्यार्थी आणि ३२ हजार २५५ विद्यार्थिनींचा समावेश होता.










