राज्यातील विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या गुणवत्तापूर्ण आणि प्रेरणादायी शिक्षकांच्या शोधाला पुन्हा सुरुवात झाली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या ‘आदर्श शिक्षक’ उपक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७साठी निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रातून दोन शिक्षकांची निवड करून त्यांची माहिती १५ जूनपर्यंत ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्यातील उत्कृष्ट शिक्षकांचे नावीन्यपूर्ण उपक्रम, अध्यापनातील प्रभावी पद्धती आणि विद्यार्थीकेंद्रित कार्य अधिक व्यापक पातळीवर पोहोचावे, या उद्देशाने हा उपक्रम राबवला जातो. गेल्या वर्षापासून सुरू झालेल्या या प्रकल्पाद्वारे शैक्षणिक गुणवत्तेला चालना देतानाच शिक्षकांच्या उल्लेखनीय कार्यालाही व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. निवड झालेल्या आदर्श शिक्षकांचा पुढे ‘मास्टर ट्रेनर’ म्हणून उपयोग करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील इतर शाळांनाही नव्या कल्पना आणि उपक्रमांची प्रेरणा मिळणार आहे. निवड प्रक्रियेसाठी शालेय शिक्षण विभागाने विविध निकष निश्चित केले आहेत. अध्यापनातील नावीन्य, शाळेतील उपक्रम, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, विद्यार्थ्यांची उपस्थिती, शिष्यवृत्ती परीक्षांमधील कामगिरी, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील सहभाग यांचा यात विचार केला जाणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांशी संवाद कौशल्य, समाजाभिमुख कार्य आणि शाळेच्या विकासातील योगदानालाही महत्त्व दिले जाणार आहे.










