‘भारत इनोव्हेट्स’मध्ये आयआयटी मुंबईची छाप

महाराष्ट्र टाइम्स

भारतातील डीप-टेक नवकल्पनांना जागतिक व्यासपीठ मिळणार आहे. 'भारत इनोव्हेट्स २०२६'मध्ये आयआयटी मुंबईच्या १६ स्टार्टअप्सची निवड झाली आहे. हे स्टार्टअप्स फ्रान्समध्ये आपले तंत्रज्ञान सादर करतील. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यातून भारतीय उद्योगांना जागतिक स्तरावर संधी मिळेल.

‘भारत इनोव्हेट्स’मध्ये आयआयटी मुंबईची छाप
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

भारतातील डीप-टेक नवकल्पनांना जागतिक व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ‘ भारत इनोव्हेट्स २०२६ ’मध्ये आयआयटी मुंबईने आपली छाप उमटवली आहे. आयआयटी मुंबईच्या सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड आंत्रप्रेन्युअरशिप (साइन) या इन्क्युबेशन केंद्रातून विकसित झालेल्या १६ स्टार्टअप्सची या प्रतिष्ठित कार्यक्रमासाठी निवड झाली असून, हे स्टार्टअप्स फ्रान्समधील नीस येथे १४ ते १६ जूनदरम्यान होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

देशभरातील विविध संस्थांमधून निवडलेल्या १२० डीप-टेक स्टार्टअप्समध्ये आयआयटी मुंबईच्या १६ स्टार्टअप्सचा समावेश असल्याने संस्थेच्या संशोधन, नवोन्मेष आणि उद्योजकता परिसंस्थेची ताकद पुन्हा अधोरेखित झाली आहे. या स्टार्टअप्सना जागतिक व्हेंचर कॅपिटल फंड, सार्वभौम निधी, आंतरराष्ट्रीय उद्योगसमूह आणि नवोन्मेष संस्थांसमोर आपले तंत्रज्ञान सादर करण्याची संधी मिळणार आहे.

शिक्षण मंत्रालयाच्या पुढाकारातून आणि भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेला ‘भारत इनोव्हेट्स २०२६’ हा भारताचा प्रमुख जागतिक डीप-टेक नवोन्मेष मंच मानला जातो. भारत-फ्रान्स नवोन्मेष भागीदारीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमातून भारतीय स्टार्टअप्सना जागतिक गुंतवणूक आकर्षित करण्यास, आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यास आणि संशोधनाचे व्यावसायिकीकरण करण्यास चालना मिळणार आहे.

कार्यक्रमाच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन उपस्थित राहणार आहेत. याशिवाय जागतिक गुंतवणूकदार, उद्योगक्षेत्रातील दिग्गज, संशोधन संस्था आणि धोरणकर्ते यांच्याशी थेट संवादाची संधी स्टार्टअप्सना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे भारतीय तंत्रज्ञानाधारित उद्योगांना जागतिक विस्तारासाठी नवे मार्ग खुले होण्याची अपेक्षा आहे.

आयआयटी मुंबई ‘भारत इनोव्हेट्स २०२६’चे नोडल संस्थान म्हणून देशभरातील सहभागी संस्था, राष्ट्रीय महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांचा समन्वय आणि कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे या उपक्रमात आयआयटी मुंबईचे नेतृत्व अधिक ठळकपणे दिसून येत आहे.