जावे स्टार्टअपच्या गावा...

Contributed byडॉ. सुचित्रा सुर्वे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अनेक विद्यार्थी ९ ते ५ची नोकरी टाळून स्टार्टअप्सकडे आकर्षित होतात. सोशल मीडियावर दिसणारी यशोगाथा आणि ग्लॅमरमागे मोठा संघर्ष असतो. स्टार्टअप म्हणजे केवळ व्यवसाय नाही, तर तंत्रज्ञान किंवा नाविन्यपूर्णतेवर आधारित वेगाने वाढणारा व्यवसाय. फंडिंग मिळणे म्हणजे यश नव्हे, तर ग्राहकांचा विश्वास आणि समस्या सोडवणे महत्त्वाचे आहे. उद्योजकतेसाठी कोणतीही विशिष्ट पदवी आवश्यक नाही, पण संबंधित क्षेत्राचे ज्ञान आणि कौशल्ये गरजेची आहेत.

जावे स्टार्टअपच्या गावा...

ला ९ ते ५ची नोकरी करायची नाही’, ‘मला कोणाच्या ऑर्डर्स ऐकायच्या नाहीत’, ‘ स्टार्टअप सुरू करून स्वतःच बॉस व्हायचे आहे’, अनेक विद्यार्थ्यांच्या मनात असे विचार दिसतात. सोशल मीडियावर तरुण उद्योजकांच्या यशोगाथा, मोठ्या गाड्या, फंडिंग, प्रसिद्धी आणि ‘हसल कल्चर’ पाहून स्टार्टअप्स खूप आकर्षक वाटतात. पण उद्योजकता म्हणजे फक्त चमकधमक नसून त्यामागे संघर्ष, अनिश्चितता, सतत शिकण्याची तयारी, आर्थिक ताण आणि अपयश स्वीकारण्याची मानसिक ताकदही असते.

  प्रत्येक व्यवसाय म्हणजे स्टार्टअप नसतो. स्टार्टअप म्हणजे एखादी टेक्नॉलॉजी किंवा इनोव्हेशनवर समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणारा आणि वेगाने वाढू शकणारा व्यवसाय. उदाहरणार्थ, छोटे दुकान, सलून किंवा रेस्टॉरंट हा व्यवसाय असू शकतो; पण हजारो किंवा लाखो लोक वापरू शकतील असे एखादे अ ॅप, डिजिटल प्लॅटफॉर्म किंवा नवीन सेवा मॉडेल हा स्टार्टअप असू शकतो.

  स्टार्टअप हे फक्त ‘प्रॉडक्ट’ आधारित असावे असे नाही; ते ‘सर्व्हिस’ आधारितही असू शकते. उदाहरणार्थ, शेतकऱ्यांसाठी डिजिटल विक्री प्लॅटफॉर्म, ग्रामीण भागासाठी ऑनलाइन शिक्षण सेवा, घरपोच हेल्थ सेवा, स्थानिक व्यवसायांसाठी सोशल मीडिया मार्केटिंग एजन्सी किंवा छोट्या उद्योगांना डिजिटल पेमेंट सोल्यूशन्स देणारी सेवा. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही कोणती समस्या सोडवत आहात? लोकांना त्याची गरज आहे का? ती कल्पना मोठ्या प्रमाणावर वाढू शकते का? हे प्रश्न महत्त्वाचे असतात.

  आजकाल ‘व्हीसी फंडिंग’ किंवा ‘व्हेंचर कॅपिटल’ हे शब्द खूप ऐकायला मिळतात. व्हेंचर कॅपिटॅलिस्ट म्हणजे असे गुंतवणूकदार जे वेगाने वाढू शकणाऱ्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवतात. पण फंडिंग मिळणे म्हणजे यश असे नाही. अनेक स्टार्टअप्सना मोठी गुंतवणूक मिळते, पण योग्य नियोजन, बाजाराची समज किंवा मजबूत अंमलबजावणी नसल्यामुळे काही वर्षांत ती बंदही पडतात. त्यामुळे प्रसिद्धीपेक्षा टिकाऊपणा, ग्राहकांचा विश्वास आणि वास्तविक समस्या सोडवणे अधिक महत्त्वाचे असते.

  एक मोठा गैरसमज म्हणजे ‘मला ऑर्डर्स घ्यायच्या नाहीत, म्हणून मी व्यवसाय करणार’. पण व्यवसायात ग्राहक, गुंतवणूकदार, टीम, मार्केट आणि कधी-कधी सरकारी नियम यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतात. म्हणजेच, नोकरीत एका बॉसचे ऐकावे लागते; पण व्यवसायात अनेक लोकांच्या गरजा आणि अपेक्षा समजून घ्याव्या लागतात. त्यामुळे उद्योजकता म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य नसून मोठी जबाबदारी असते.

  उद्योजकतेसाठी किंवा स्टार्टअप सुरू करण्यासाठी एखादी ठरावीक पदवी असणे आवश्यक नाही. ‘बीबीए केले तरच व्यवसाय करता येतो’ किंवा ‘एमबीए केल्याशिवाय स्टार्टअप सुरू होत नाही’ हा गैरसमज आहे. कोणत्याही शाखेतील विद्यार्थी उद्योजक होऊ शकतात. मात्र, ज्या क्षेत्रात काम करायचे आहे त्या क्षेत्राचे ज्ञान आणि कौशल्य असणे खूप महत्त्वाचे असते.

  उदाहरणार्थ, टेक्नॉलॉजी आधारित अ ॅप किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करायचा असेल, तर कोडिंग, यूआय/ यूएक्स, एआय, डेटा आणि डिजिटल टूल्स यांची मूलभूत माहिती असणे उपयुक्त ठरते. फूड, फॅशन, हेल्थ, मीडिया किंवा कृषी क्षेत्रात काम करायचे असेल, तर त्या उद्योगाचे व्यवहारज्ञान समजून घेणे आवश्यक असते. त्याचबरोबर व्यवसायाचे बेसिक्स जसे की, मार्केटिंग, ग्राहकांची गरज समजून घेणे, आर्थिक व्यवस्थापन, विक्री, ब्रँडिंग, संवादकौशल्य आणि टीम मॅनेजमेंट, हे शिकणेही तितकेच महत्त्वाचे आहे. उद्योजकतेत फक्त कल्पना महत्त्वाची नसते; त्या कल्पनेची योग्य अंमलबजावणी, सातत्य आणि लोकांचा विश्वास जिंकण्याची क्षमता अधिक महत्त्वाची असते.

  विद्यार्थ्यांनी उद्योजकीय मानसिकता विकसित करण्यासाठी आत्तापासून काही गोष्टी सुरू करू शकतात, छोट्या समस्या ओळखणे, त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करणे, लोकांशी संवाद वाढवणे, आर्थिक शिस्त शिकणे, डिजिटल कौशल्य विकसित करणे, टीममध्ये काम करणे आणि अपयशातून शिकण्याची सवय लावणे. कॉलेजमध्ये छोट्या प्रोजेक्ट्स, फ्रीलान्सिंग, ऑनलाइन विक्री, इंटर्नशिप, स्वयंसेवी उपक्रम किंवा कौटुंबिक व्यवसायात सहभाग यामुळे प्रत्यक्ष अनुभव मिळतो.

  उद्योजकता हे फक्त करिअर नाही; ती एक मानसिकता आहे. त्यामुळे ‘ग्लॅमर’, ‘फंडिंग’ किंवा ‘९ ते ५पासून पळ’ म्हणून नव्हे तर जबाबदारी, समस्या सोडवण्याची वृत्ती, मूल्यनिर्मिती आणि खरा उद्योजक फक्त स्वतःसाठी पैसा कमवत नाही, तर इतरांसाठी संधी, रोजगार आणि बदलही निर्माण करत असतो.

(लेखिका करिअर मार्गदर्शक आहेत.)