अस्वस्थ आठवणींशी झगडा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अहमदाबाद येथे एका वर्षापूर्वी झालेल्या एअर इंडियाच्या भीषण विमान अपघाताची आठवण ताजी आहे. या दुर्घटनेतून वाचलेले आर्यन असारी आणि विश्वासकुमार रमेश आजही त्या भयानक क्षणांशी झगडत आहेत. अपघातात अनेकांचा मृत्यू झाला. टाटा समूहाने मृतांच्या कुटुंबीयांना आणि जखमींना मदत केली आहे. तरीही, अनेकांना मानसिक आधाराची गरज भासत आहे.

अस्वस्थ आठवणींशी झगडा

मेघराज ( गुजरात ) : वर्षापूर्वी अरवली जिल्ह्यातील एका दुर्गम गावातील १८ वर्षांचा आर्यन असारी हा एक शाळकरी मुलगा होता, ज्याने कधी विमान इतक्या जवळून पाहिलेही नव्हते. मात्र, आज तो आपल्या गावात आणि आसपासच्या परिसरात ‘एरोप्लेन बॉय’ म्हणून ओळखला जातो. गेल्या वर्षी १२ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताचे शेवटचे क्षण त्याच्या मोबाइल कॅमेऱ्यात चुकून कैद झाले होते. मात्र, या प्रसिद्धीची आर्यनला मोठी किंमत मोजावी लागली आहे. त्या दिवसानंतर त्याने एकाही विमानाचा व्हिडिओ काढलेला नाही आणि विमानाने प्रवास करण्याची त्याची अद्याप हिंमत झालेली नाही.

गुजरातमधील अहमदाबादधील एअर इंडियाच्या ‘फ्लाइट १७१’ हे विमान कोसळल्याच्या भीषण दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले. या अपघातात विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला होता, तर केवळ एकच प्रवासी सुदैवाने वाचला होता. आज एक वर्षानंतरही रमेश हे झोप न येणे, प्रचंड अस्वस्थता आणि अपघाताच्या त्या भयानक आठवणींशी संघर्ष करीत आहेत.

...अंगावर रक्ताचे डाग असलेला टी-शर्ट आणि हातात मोबाइल घेऊन अपघातस्थळावरून दूर जाणारे विश्वासकुमार रमेश यांचे फोटो त्या वेळी जगभरातील प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. आज एक वर्षानंतरही रमेश हे झोप न येणे, प्रचंड अस्वस्थता आणि अपघाताच्या त्या भयानक आठवणींशी संघर्ष करीत आहेत. रमेश यांनी सांगितले, ‘मी या अपघातातून वाचलो हे लोकांना दिसते, पण चार भिंतींच्या आड मी दररोज कोणत्या आव्हानांना तोंड देत आहे, हे कोणालाच माहीत नाही. या घटनेला वर्ष झाले असले, तरी मी अजूनही माझे आयुष्य पूर्वपदावर आणण्याचा आणि माझ्या कुटुंबाला सावरणारा आधार होण्याचा प्रयत्न करीत आहे.’

बोइंग ७८७ ड्रीमलायनर या विमानात १२ विमान कर्मचाऱ्यांसह (क्रू मेंबर्स) २४२ जण होते. १२ जून २०२५ रोजी उड्डाण केल्यानंतर अवघ्या ३२ सेकंदांतच हे विमान एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे वसतिगृह आणि उपाहारगृहाच्या इमारतीवर कोसळले. या भीषण अपघातात एकूण २६० जणांचा मृत्यू झाला. लेस्टर (ब्रिटन) येथे आपल्या कुटुंबासह राहणारे ३९ वर्षीय रमेश यांनी या दुर्घटनेत त्यांचा भाऊ अजय याला गमावले. या घटनेने एक व्यक्ती म्हणून आपल्याला पूर्णपणे बदलून टाकले, असेही रमेश यांनी सांगितले.

एक कोटीची मदत

अहमदाबाद : गेल्या वर्षी अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडिया विमान अपघातातील २६० मृतांपैकी ९१ टक्के कुटुंबांना टाटा ग्रुपने प्रत्येकी एक कोटींची सानुग्रह मदत दिली आहे, तर ९६ टक्के कुटुंबांना २५ लाख रुपयांची अंतरिम मदत मिळाली आहे. उर्वरित प्रकरणे कागदपत्रांअभावी प्रलंबित आहेत. बहुतांश संबंधित वस्तू व डिजिटल उपकरणे कायदेशीर मंजुरीनंतर कुटुंबीयांना सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आल्या आहेत. १५ मृत व्यक्तींच्या नातेवाइकांनी वस्तू घेण्यास नकार दिला.

दरम्यान, ९४ टक्के जखमींनाही भरपाई देण्यात आली आहे, अशी माहिती टाटा समूहातर्फे देण्यात आली.