नाशिक : पहाटे चारलाच अभ्यासाला बसायचं. सहाला वृत्तपत्रांची लाइन लावून देण्यात वडिलांना मदत करायची. दुपारी शाळेतून परतल्यावर चार तास अभ्यास करायचा. सायंकाळी मेसचे डबे भरायचे अन् वेळेचं गणित जमवून भरतनाट्यमही शिकायचं. पहाटे चार ते रात्री दहापर्यंतच्या व्यस्त दिनक्रमातही दहावीत १०० टक्के गुण मिळवित तिने यशाला गवसणी घातली. श्रावणी महेश नांदुर्डीकर असं या गुणी मुलीचं नाव.
आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी श्रावणीचं स्वप्न मोठं अन् आत्मविश्वास दांडगा आहे. आयआयटीतून कम्प्युटर सायन्सचं शिक्षण घ्यायचं आणि यूपीएससी परीक्षांद्वारे आयएएस अधिकारी बनण्याचा तिचा निग्रह आहे. शिक्षणासाठी कर्ज घेणाऱ्या या गुणी मुलीला हवंय दानशूरांचं आर्थिक पाठबळ.
‘चित्र काढते, पोळ्या करते, गाणे गाते, दु:खालाही खुशाल पिसते माझी मुलगी...’ ज्येष्ठ गझलकार प्रदीप निफाडकर यांच्या ‘माझी मुलगी’ या गझलेतील ओळी श्रावणी जगतेय. ती भरतनाट्यम शिकते. नाटकात अभिनय करते. वक्तृत्व, सुंदर हस्ताक्षर, गीतेचा अध्याय पाठांतर अशा स्पर्धांमध्ये श्रावणीचं बक्षीस ठरलेलं. आई-बाबांना कामात मदत करणं, पहिलीत शिकणाऱ्या भावाला सांभाळणं आणि आता तर दर रविवारी भरतनाट्यमची शिकवणी घेण्याकरिता सिन्नरला जाणं. एवढ्या कमी वयात एक ना अनेक जबाबदाऱ्या पेलणारी श्रावणी न चुकता पहाटे चारलाच पुन्हा अभ्यासासाठी सज्ज असायची.
श्रावणी नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या मेरी येथील इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत तिने १०० टक्के गुण मिळवून यशाला गवसणी घातली. सर्वच विषयांत तिने डोळे दिपविणारे गुण मिळविले आहेत. एरव्ही सहा ते आठ तास आणि परीक्षा काळात १२ ते १३ तास मन लावून अभ्यास केल्याने एवढे गुण मिळतील, अशी खात्री होतीच असे श्रावणी सांगते. विशेष म्हणजे दहावीतही तिला शिकवणी नव्हती. शाळेतील शिक्षकांकडून शंकानिरसन करून घ्यायचे आणि घरी सराव करायचा, असे तिच्या अभ्यासाचे स्वरूप. कुटुंबात आई तृप्ती, वडील महेश आणि लहान भाऊ शर्व यांचा समावेश आहे. हे कुटुंब निफाड तालुक्यातील नांदुर्डीचं. आजोबा पोस्टमन. त्यांच्या नोकरीमुळं हे कुटुंब नाशिकमध्ये स्थिरावलं. आरटीओ कॉर्नरजवळील गोरक्षनगरमध्ये हे कुटुंब राहते. दोन मजली घरात खाली श्रावणीचे मोठे काका-काकू आजी-आजोबांसमवेत राहतात. आजोबांचे वय ८६ असून आजारपणामुळे ते बेडवर पडून असतात. श्रावणीचं घरही छोटंच. एकावेळी एकच माणूस जाईल अशा लोखंडी जिन्याने वरच्या मजल्यावर जाता येते.
अधिकारी व्हायचंय...२











