आरोग्यविषयक धोक्यांच्या पार्श्वभूमीवर, अंबरनाथ पालिकेने काही दिवसांपूर्वी कबुतरांना खाद्य देणाऱ्यांविरोधात दंडात्मक मोहीम सुरू केली होती. मात्र, ही मोहीम अल्पावधीतच थंडावल्याने शहरातील विविध भागांत पुन्हा कबुतरांना दाणे टाकण्याचे प्रकार सर्रास सुरू झाले आहेत.
अंबरनाथमध्ये कबुतरांची संख्या कमालीची वाढल्याने त्यांच्या विष्ठेमुळे परिसर अस्वच्छ होत असून, नागरिकांमध्ये श्वसनविकारांसह विविध आजारांचा धोका वाढण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. शहरात केवळ दंडाची घोषणा करण्याऐवजी पालिकेने कबुतरांना खाद्य देण्यास बंदी असल्याचे स्पष्ट करणारे फलक लावावेत आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सातत्याने दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी सुजाण नागरिकांकडून होत आहे. पालिकेने केवळ कागदावर किंवा काही दिवसांपुरती मोहीम राबविण्याऐवजी प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.











