शब्द, कविता, आठवणींनी भारावले रसिक

महाराष्ट्र टाइम्स

वाशीतील साहित्य मंदिर सभागृह 'महाराष्ट्र टाइम्स'च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित 'किस्से कविता आणि संकर्षण' या कार्यक्रमात रसिक शब्दांनी आणि आठवणींनी भारावले होते. संकर्षण कऱ्हाडे यांनी आपल्या जीवनप्रवासातील अनुभव सांगितले. त्यांनी उपस्थितांना हसवले, विचार करायला लावले आणि भावूकही केले. आईवरील कवितांनी अनेकांना स्पर्श केला. सभागृह पूर्ण क्षमतेने भरले होते. 'महाराष्ट्र टाइम्स'ने आयोजित केलेल्या या दर्जेदार कार्यक्रमाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

शब्द, कविता, आठवणींनी भारावले रसिक
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

वाशीतील साहित्य मंदिर सभागृह शनिवारी अक्षरशः भारावून गेले होते, निमित्त होते, ‘ महाराष्ट्र टाइम्स ’च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘किस्से कविता आणि संकर्षण’ या विशेष कार्यक्रमाचे. यावेळी उपस्थितांना कधी खळखळून हसवले, कधी विचार करायला भाग पाडले, तर कधी डोळ्यांच्या कडा नकळत ओलावून टाकल्या.

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वर्धापन दिनानिमित्त वाशी येथील मराठी साहित्य संस्कृती कला मंडळाच्या सभागृहात संकर्षण कऱ्हाडे यांच्या कविता, किस्से आणि मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आमदार मंदा म्हात्रे आणि महापौर सुजाता पाटील प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.


शब्द, कविता, आठवणींनी भारावले रसिक

मुलाखतकार सौमित्र पोटे यांनी साधलेल्या संवादातून संकर्षण कऱ्हाडे यांनी आपल्या जीवनप्रवासाचा वेध घेतला. मुंबईपर्यंतचा आणि त्यानंतर परदेशापर्यंत पोहोचलेल्या प्रवासातील अनुभव त्यांनी रसिकांसमोर उलगडले. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. टाळ्या आणि हशांनी सभागृह दुमदुमून गेले. संघर्षातून यशाकडे वाटचाल करण्याचा संदेश त्यांच्या अनुभवांतून मिळाला, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. आईवर आधारित त्यांच्या कवितांनी अनेकांना भावूक केले.

कार्यक्रमासाठी सभागृह पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामुळे अतिरिक्त खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली. मात्र, त्यानंतरही अनेकांनी उभे राहून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. काही जण व्यासपीठाच्या बाजूला, तर काही पायऱ्यांवर बसून कार्यक्रम पाहत होते. प्रवेशद्वाराजवळही मोठ्या संख्येने रसिक उभे होते. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने वाचकांसाठी असा दर्जेदार कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.